ओमायक्रॉनची धास्ती, मुंबईतील शाळा ऑनलाईनच?

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात 1 डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. शाळेत तीन ते चार तासांपर्यंतच शिकविले जावे, अशी अट घालताना एका बाकावर एकच विद्यार्थी याप्रमाणे बैठकव्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या अवताराच्या धास्तीने मुंबईतील पालक मुलांना शाळेत पाठवण्याच्या मानसिकतेत नसल्यामुळे मुंबईतील शाळा सुरू होणार की नाही याबद्दल अनिश्‍चितता आहे. त्यामुळे तूर्त तरी मुंबईतील शाळा ऑनलाईनच सुरू राहतील, असे चित्र आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या काळात शाळेत कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलन तसेच खेळाचे आयोजन करू नये, शाळेत विलगीकरणाची सुविधा असावी, शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती घ्यावी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे 100 टक्के लसीकरण आवश्यक तसेच शाळेच्या प्रशासनाने स्थानिक आरोग्य विभागाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे, असे नमूद आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कोविड-19 साठीची 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी, विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे.

शाळेतील परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठकादेखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी. सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे 100 टक्के लसीकरण झालेले असावे.तसेच शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचेदेखील पालन करण्यात यावे, असेही या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अन्लॉकच्या नियमांत बदल नाही : राजेश टोपे

राज्यात कोणत्याही परिस्थितीत आजच्या अन्लॉकच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सगळे बिझनेस हाऊसेस आणि सरकारने ज्या गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली आहे अशा सर्व आस्थापना, प्रतिष्ठाने सुरूच राहतील. त्यामध्ये कोणताही बदल करण्याचा राज्य सरकारचा विचार नाही, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शाळांवर परवानगीसोबत 38 अटींचा भडिमार

कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाईन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र शाळा सुरू करताना 38 अटींचा भडिमार केल्याने शाळा व्यवस्थापन मेटाकुटीस येणार आहेत.

या सूचनांमध्ये दोन मुलांमध्ये 6 फुटांचे अंतर ठेवावे, प्रत्येकाला फेस मास्क बंधनकारक, शिंकताना तोंडावर मास्क, रुमाल आवश्यक, वापरलेल्या टिश्यू पेपरची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक, आजारांची कोणतीही लक्षणे आढळल्यास शाळांमध्ये सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, कंटेन्मेट झोनमधील शाळा उघडू नयेत, विद्यार्थी हे कंटेन्मेंट झोन क्षेत्रात राहणारे असतील तर त्यांना शाळेत अनुमती देऊ नये, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना कंटेन्मेंट झोनमध्ये जाण्यापासून रोखावे इत्यादी इत्यादी 38 अटींचा भडिमार शासनाने परिपत्रकात केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news