रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त | पुढारी

रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या संचालक मंडळाला भारतीय रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स कॅपिटल कंपनी तिच्या सर्व कर्जदारांना पेमेंट करण्यात अयशस्वी ठरली आहे. त्याचबरोबर कंपनीतील अनेक कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे चिंताजनक मुद्दे समोर आले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जून 2019 मध्ये कंपनीच्या लेखापरीक्षकांनी कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांबाबत आणि त्यातील हिशेबाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रिलायन्स कॅपिटलच्या कर्जदारांमध्ये प्रामुख्याने अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे. रिलायन्स कॅपिटलकडे या कंपन्यांचे अंदाजे 624 कोटी रुपये कर्जाचे व्याज थकीत आहे. त्यामुळे कंपनीवर इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोडअंतर्गत दिवाळखोरी प्रक्रिया सुरू केली जाईल. नॉन बँकिंग क्षेत्रातील अशा प्रकारे कारवाई होणारी ही तिसरी कंपनी ठरली आहे. याआधी दिवाण हाऊसिंग फायनान्स आणि श्रेईविरोधात दिवाळखोरी जाहीर केली होती.

दरम्यान, 2018 नंतर कंपनीने तिमाही निकाल जाहीर करणे बंद केले आहे. डिसेंबर 2018 मध्ये कंपनीचा महसूल 568 कोटी तर शुद्ध नफा अंदाजे 89 कोटी रुपये होता. यात प्रमोटर्सचा वाटा 1.51 टक्के आहे, तर जनतेचा वाटा 97.85 टक्के आहे. प्रमोटर्समध्ये अनिल अंबानींचे 11.06 लाख समभाग, टिना अंबनींकडे 2.63 लाख समभाग, मुलगा जय अनमोल अंबानीकडे 1.78 लाख समभाग आणि जय अंशुलकडे 1.78 लाख समभाग आहेत. कोकिळाबेन अंबानी यांच्याकडे 5.45 लाख समभाग आहेत.

Back to top button