सागरेश्वर अभयारण्यात बिबट्याचा मुक्काम | पुढारी

सागरेश्वर अभयारण्यात बिबट्याचा मुक्काम

देवराष्ट्रे : पुढारी वृत्तसेवा

स्व. यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात बिबट्याने मुक्काम करून आता एक वर्ष झाले आहे. बिबट्याच्या आगमनाने या अभयारण्याच्या वन्यप्राणी वैभवात भर पडली आहे. मात्र पर्यटनावर याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

अभयारण्यात पायी फिरण्यास व दुचाकीवरून अभयारण्यात जाण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. यामुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. वनविभागाने अभयारण्यात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने सागरेश्वर अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे. येथे वाघ सोडण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.

त्यासाठी दिल्ली येथील एन. टी. आर. सी. च्या तज्ज्ञांचे पथक येथे पाहणी करून गेले होते. मात्र त्यानंतर कोणताही निर्णय झालेला नव्हता.
मात्र त्याच काळात अभयारण्यात अचानकच बिबट्याचे दर्शन झाले. यातून परिसरात खळबळ उडाली होती. सांगली येथील काही पक्षी तज्ज्ञ अभयारण्यात फिरत असताना त्यांना बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले होते.

त्यानंतर अभयारण्यातील काही भागात सी. सी. टी. व्ही. बसवण्यात आले. यातीच चित्रीकरणात देखील या अभयारण्यात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले होते. या सार्‍या घटनाक्रमाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. अभयारण्यात बिबट्या दाखल झाल्यानंतर पर्यटनावर याचा फार मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

वन विभागाने पायी व दुचाकीवरून अभयारण्यात जाण्यास मनाई केल्याने पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे.
वनविभाग प्रशासनाने पर्यटन सफारी गाडीची सोय केली आहे.दिवसभरात या गाडीतून अपवाद वगळता तीन वेळेला पर्यटकांना घेऊन फेरफटका मारण्यात येतो.

दरम्यान, अभयारण्यातील बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करून अभयारण्यातून बाहेर पडत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अभयारण्याच्या कुंपणाशेजारी अनेकवेळा बिबट्या दिसून आला आहे. बिबट्याच्या भीतीने अभयारण्यातील वानरे बाहेर पडली आहेत. वानरांमुळे अभयारण्यालगत असलेल्या शेतीवाडीतील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन विभागाने, स्थानिक प्रशासनाने पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

Back to top button