कोल्हापूर : आईला मारहाणीची धमकी; नैराश्यातून मुलाची आत्महत्या | पुढारी

कोल्हापूर : आईला मारहाणीची धमकी; नैराश्यातून मुलाची आत्महत्या

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून आईला मारहाण करण्याची धमकी दिल्याने मनाला वाईट वाटून कसबा बावडा येथील तरुण मुलाने नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सनी दयानंद कांबळे (वय 27, रा. आंबे गल्‍ली) असे त्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संग्राम गुरबे (रा. धनगर गल्‍ली), शशिकांत गायकवाड (रमणमळा), सागर चौगुले (धनगर गल्‍ली), योगेश पाटोळे (भगतसिंग वसाहत), सिद्धार्थ माने (आंबेडकरनगर), अल्बाज नाईक (शाहूपुरी, कोल्हापूर) यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

विजय दिलीप कांबळे (रा. संकपाळनगर) यांनी संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. सनी कांबळे व संशयितांत वाद होता. सनीने काही दिवसांपूर्वी गुरबेसह गायकवाड व सागर चौगुले यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या कारणातून त्यांच्यात वादावादीही झाली.

संशयितांनी सनीला मारहाण करून त्याच्या आईलाही मारहाणीची धमकी दिली होती. धमकीमुळे सनी तणावात होता. संशयितांनी आईला मारहाणीची धमकी दिल्याचे त्याला वाईट वाटले होते. नैराश्यातून त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सनी कांबळे याने लिहिलेल्या चिठ्ठीत संशयितांच्या नावांचा उल्‍लेख केला आहे. त्यांच्याकडून झालेली मारहाण, आईला मारहाणीच्या दिलेल्या धमकीमुळे आत्महत्या करीत आहे, असे चिठ्ठीत म्हटले आहे. शाहूपुरी पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.

Back to top button