Mutual funds : एनएफओमध्ये गुंतवणूक करताना... | पुढारी

Mutual funds : एनएफओमध्ये गुंतवणूक करताना...

शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमध्ये (Mutual funds) तुम्हाला रस असेल तर एनएफओ हे नाव तुम्ही ऐकले असेलच. न्यू फंड ऑफर असा त्याचा अर्थ आहे आणि म्युच्युअल फंडांकडून किंवा संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांकडून तो सादर केला जातो. म्युच्युअल फंड कंपन्यांचा एनएफओ आणि अन्य कंपन्यांचा आयपीओ हे प्रथमदर्शनी एकसारखेच वाटतात. परंतु, या दोहोत काही पायाभूत फरक आहेत. या पार्श्वभूमीवर, एनएफओ काय आहे आणि त्याचे फायदे-तोटे काय आहेत, याविषयी….

म्युच्युअल फंड (Mutual funds) कंपनी किंवा असेट मॅनेजमेंट कंपनीकडून सादर करण्यात येणार्‍या नव्या फंड ऑफरला एनएफओ असे म्हणतात. ज्याप्रमाणे कंपन्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजे आयपीओ सादर करतात, त्याप्रमाणे म्युच्युअल फंड कंपन्या किंवा असेट मॅनेजमेंट कंपन्या न्यू फंड ऑफर म्हणजे एनएफओ सादर करून आपले भांडवल उभारतात. आयपीओप्रमाणेच एनएफओसुद्धा एका ठरावीक अवधीपर्यंतच खुला राहतो. आयपीओची प्रतिशेअर फेस व्हॅल्यू न्यूनतम असते, त्याचप्रमाणे एनएफओची फेस व्हॅल्यूसुद्धा न्यूनतम असते. सामान्यत: एनएफओचे प्रारंभिक मूल्य दहा रुपये प्रति एनएव्ही असते.

या माध्यमातून जमविलेला पैसा सरकारी बाँड्स किंवा इक्विटी आदींमध्ये गुंतविला जातो. सामान्यतः म्युच्युअल फंड कंपन्या आपल्या उत्पादनांच्या बास्केटमध्ये विविधता आणण्यासाठीही एनएफओ लाँच करतात. समजा, एखाद्या म्युच्युअल फंड हाऊसकडे अनेक फंड योजना आहेत; परंतु फार्मा कंपनीशी संलग्न कोणताही फंड नाही. अशा स्थितीत ती कंपनी फार्मा फंडच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांत विविधता आणू शकते.

एनएफओ सामान्यतः दोन प्रकारचे असतात. एक ओपन एन्डेड फंड आणि दुसरे क्लोज एन्डेड फंड. ओपन एन्डेड फंड दुसर्‍यांदा खुले होतात आणि ते दुसर्‍यांदा खुले होताच, त्यात आणखी रक्कम गुंतविता येऊ शकते. मात्र, क्लोज एन्डेड फंडमध्ये केवळ ते खुले होतात त्याच वेळी गुंतवणूक करता येते.

वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्यांकडून सादर केले जाणारे आयपीओ आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून सादर करण्यात येणारे एनएफओ यामध्ये वरवर पाहता काहीच फरक नसला तरी मुळात ही दोन्ही वित्तीय उत्पादने एकमेकांपासून खूपच वेगळी आहेत.

आयपीओ कोणत्याही क्षेत्रात काम करणारी कंपनी बाजारात आणू शकते. त्याचा वापर ही कंपनी बाजारातून भांडवल जमा करण्यासाठी करीत असते आणि आयपीओ बंद झाल्यानंतर काही वेळात कंपनीचा शेअर भांडवल बाजारात लिस्टेड होतो. भांडवल बाजारात शेअर सूचिबद्ध झाल्यानंतर जेव्हा त्याची खरेदी-विक्री सुरू होते, तेव्हा त्याचे मूल्यही वर-खाली होत राहते. अर्थात, कंपन्यांच्या आयपीओचे मूल्य दहा रुपयांपासून सुरू होत असले तरी कंपनी आधीपासूनच शेअर बाजारात लिस्टेड असेल, तर दर्शनी मूल्यात म्हणजे फेस व्हॅल्यूमध्ये प्रीमियम म्हणजेच शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सचे सध्याचे मूल्यातील अंतरसुद्धा त्यात मिळविले जाते.

उदाहरणार्थ, जर कंपनी दहा रुपयांच्या दर्शनी मूल्याचा आयपीओ घेऊन आली आणि बाजारात कंपनीच्या शेअरचे सध्याचे मूल्य तीस रुपये असेल, तर कंपनी सध्याच्या मूल्यात काही सूट देण्याबरोबरच फेस व्हॅल्यू आणि प्रीमियमची रक्कम त्यात मिळवून गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक प्राप्त करते. सूचिबद्ध झाल्यानंतर जेव्हा कंपनीच्या शेअरचा भाव वर-खाली होण्यास सुरुवात होते, तेव्हा हळूहळू प्रतिशेअर मूल्यही वाढते. (Mutual funds)

आपण शेअर बाजारात पाहिले असेल की, दहा रुपयांचे दर्शनी मूल्य असणार्‍या अनेक शेअरचे भाव वाढून आता दोन हजार किंवा त्याहूनही अधिक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता एनएफओविषयी चर्चा करू या. एनएफओमध्ये म्युच्युअल फंड कंपनीची प्रती एनएव्ही फेस व्हॅल्यू दहा रुपयेच असते. नंतर जेव्हा कंपनी गुंतवणूकदारांकडून प्राप्त झालेली रक्कम शेअर बाजारांत किंवा बाँड्समध्ये गुंतविते, तेव्हा हळूहळू एनएव्हीचे दर्शनी मूल्य वाढू लागते.

आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये लाँच केलेल्या एनएफओची गरज आहे, असे गुंतवणूकदारांना जेव्हा वाटेल तेव्हाच एनएफओमध्ये गुंतवणूक करावी. उदाहरणार्थ, समजा तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये औषधनिर्मिती क्षेत्राशी निगडित कंपनीचा एकही फंड नाही आणि कोरोना काळात या क्षेत्राशी संलग्न कंपन्यांचे शेअर्स खूपच चढले आहेत, तर अशा स्थितीत तुम्ही फार्मा क्षेत्रातील म्युच्युअल फंडात अवश्य गुंतवणूक केली पाहिजे. केवळ एनएव्हीचे मूल्य दहा रुपये आहे, एवढेच पाहून एनएफओमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही.

सुभाष वैद्य

Back to top button