भिलवडीत राष्ट्रगीताने होते दिवसाची सुरुवात | पुढारी

भिलवडीत राष्ट्रगीताने होते दिवसाची सुरुवात

प्रदीप माने

भिलवडी : राष्ट्रगीताने दिवसाची सुरुवात करणारे गाव, अशी आता भिलवडीची ओळख निर्माण झाली आहे. गावातील व्यापार्‍यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम अखंडित सुरू आहे.

भिलवडी हे सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठावरील 17,000 लोकसंख्येचे गाव. या गावात अनेक स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. सैनिकांचे गाव म्हणूनही या गावाची ओळख आहे. कोरोना काळात गावातील सर्व व्यवसाय बंद होते. सकाळी नऊ वाजता ही दुकाने उघडण्याची वेळ पोलिसांनी दिली. ही वेळ गावातील सर्वांना कळण्यासाठी व्यापार्‍यांनी 9.15 वाजता राष्ट्रगीत सुरू करून व्यवसाय सुरू करण्यास प्रारंभ केला. यामुळे सर्वांना ही वेळ माहीत झाली आणि गाव खरेदी-विक्रीसाठी एकत्र येऊ लागले. तिथून पुढे हा उपक्रम कायम सुरू ठेवण्यात आला. सकाळी 9.15 वाजता राष्ट्रगीत सुरू होत असल्याची सूचना गावातील एका इमारतीवर लावलेल्या भोंग्यावरून दिली जाते. त्यावेळी असेल त्या परिस्थितीमध्ये, असेल तेथे गावातील सर्व ग्रामस्थ, वाहने थांबतात व राष्ट्रगीताचा सन्मान राखतात.

ही संकल्पना दीपक पाटील, महेश शेटे, बशीर आत्तार, सचिन नावडे, बापू जगताप, सुबोध वाळवेकर, जावेद शेख, रमेश पाटील या व्यापार्‍यांनी बैठकीमध्ये मांडली. ती सर्वांना आवडली आणि तत्काळ अंमलातही आणली. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरी, सांगली जिल्ह्यातील कुंडल आणि पलूस या गावांनी भिलवडीच्या राष्ट्रगीताच्या पॅटर्नचा आदर्श घेऊन दररोज राष्ट्रगीताचा उपक्रम सुरू केला. भारतीय स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी सर्व भिलवडीकर बाजारपेठेमध्ये एकत्र येतात आणि एकत्रितपणे राष्ट्रगीत गायिले जाते.

माजी सैनिक देतात मानवंदना

सरपंच विद्या पाटील यांनी सांगितले की, भिलवडीतील माजी सैनिकांची संघटना येथे काम करत आहे. ग्रामपंचायतीनजीक त्यांचे कार्यालय आहे. 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला तर ते मानवंदना देतातच. तसेच माजी सैनिकांच्या निधनानंतर स्मशानभूमीत मानवंदना देणारे गाव, असाही या गावाचा परिचय बनत चाललेला आहे.

Back to top button