सांगली : बालिकेच्या बळीचे आरोपी कोण? | पुढारी

सांगली : बालिकेच्या बळीचे आरोपी कोण?

सांगली : एक-दोन वर्षाची चिमुरडी गटारीत पडून मरते आणि शहर मात्र विकासाच्या गोष्टी करते, हे भयंकर आहे. हा कसला विकास आहे? कोणाचा विकास आहे? ज्या शहरात स्पिडब्रेकरवरून पडून बळी जातात, ज्या शहरात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळं अपघात होतात आणि ज्या शहरातील गटारीत पडून मुलांचे हकनाक जीव जातात, त्या शहराला विकासावर बोलायचा अधिकार तरी उरतो का? जे शहर डासांनी काबीज केलं आहे, ज्या शहरावर डेंग्यू आणि संसर्गजन्य आजारांनी थैमान घातलं आहे, जे शहर बारोमास धुळीत गुदरमतं आहे, त्या शहरानं विकासाच्या गोष्टी करणं नुसतं दुर्दैवाचंच नाही, तर लाजीरवाणं नाही का?

राजू मुलाणी… बायको आणि मुलगी तहुरासोबत शामरावनगरात ज्ञानेश्वर कॉलनीत राहतात. झोपडीत राहून गरिबीत संसार ओढणारी ही माणसं. हाता-तोंडाचा मेळ घालत घालतंच आयुष्य जगणारी ही माणसं. कधीतरी अच्छे दिन येतील आणि सुखाचे चार घास मिळतील, याची वाट बघत बसलेली. यांची संपत्ती म्हणजे तरी काय? तर पोटची मुलं. तहुरा ही राजू यांची संपत्ती. दोन वर्षांची ही पोर. माणूस कितीही गरीब असला तरी, तो पोटच्या मुलाला काही कमी पडू नेत नाही. जीव जाईपर्यंत तो राब राबतो; पण मुलाला जिवापाड जपतो. पण त्याच्या हाती काय लागते? तहुरा खेळता-खेळता गटारीत पडली आणि क्षणात सारं संपलं. आता अंगणात खेळत असणारी तहुरा कुठंच दिसत नाही म्हटल्यावर, तिला शोधायला फिरणारी आजूबाजूची माणसं कावरीबावरी झालेली. कुणाला तरी तोवर तहुराचा ड्रेस गटारीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. तो ओढला, तर त्यासोबत तहुराच गटारीतून बाहेर आली. नुकतीच अंगणात खेळणारी तहुरा गटारीत पडली होती आणि आता हाती होती ती तिची डेडबॉडी. कोवळ्या तहुराचा मृतदेह हातात घेऊन हंबरडा फोडणारी तिची आई… आता हे शहर तिला कोणत्या तोंडानं विकासाच्या गोष्टी सांगेल?

शामरावनगरमध्ये हा तिसरा बळी. याअगोदर पाणी भरताना टँकरवर महिलांच्या भांडणात शकीला मिरजेचा बळी गेला. पाणीच नसल्यानं लोकांनी भरून ठेवलेल्या बादलीत पडून एका तीन वर्षांच्या मुलीचा हकनाक बळी गेला आणि आज तहुरा गेली. पावसाळा असता, पावसाच्या पाण्यानं गटारी तुंबल्या असत्या, तर यंत्रणेला बोलायला काही कारण सापडलंही असतं. पण इथं प्यायला पाणी नसण्याच्या दिवसांत गटारीत पडून बालिका गेली! मग भर पावसाळ्यात काय अवस्था असेल? सांगलीसारख्या सुसंस्कृत आणि विकासाच्या गोष्टी करणार्‍या शहरात पाणी आणि गटारीमुळं जीव गेले. या शहरात माणसाचा जीव इतका स्वस्त कसा काय झाला? पाणी आणि गटारीमुळं गोरगरिबांचे जीव जावेत, इतका कसला विकास या शहरानं केला?

तुंबलेल्या गटारी, कधीकाळापासून साचून राहिलेली घाण पाण्याची तळी, माणसं हरवतील इतके उंच गवत, काटेरी झुडपांच्या जंगलात फिरणारी माणसं, मोकाट जनावरं, डास-सापांचा तर सर्रास वावर आणि दारुड्यांची – गांजाड्यांची दहशत… ही शामरावनगरची ओळख पुसायची जबाबदारी कुणाची?

शामरावनगरात राहणार्‍यांना महापालिकेनं सहनशीलता पुरस्कारच द्यायला पाहिजे. सुविधांच्या नावानं चांगभलं असलेल्या या भागात माणसं कशी राहत असतील, असा सवाल पडतो. पण ज्यांना तो पडायला पाहिजे, त्यांना मात्र तो पडत नाही.

चिखल, दलदल, गटारी घाणेघाण पाहायच्या असतील, तर त्या शामरावनगरात. शंभरफुटी रोडच्या अलीकडं गावठाण आणि पलीकडं सगळा पडिक भाग होता. पण याच भागावर शामरावनगर वसलं. बशीसारखं नगर. पहिल्यापासून भागातलं सारं पाणी या भागात मुक्काम करतं. 1985 पासून इथं वसाहतीला सुरुवात झाली, तेव्हा गुंठ्याचा दर होता अवघा 4-5 हजार. अंगमेहनती-मजूर-कामगारांनी गुंठाभर जागा घेऊन शामरावनगरात घरं बांधली आणि आज इतक्या वर्षांनंतरही ही सारी अस्वच्छता अंगवळणी पडल्यासारखी माणसं इथं राहत आहेत. गटारीत बळी गेले तरी जगत आहेत.

शंभरफुटीवरील राजर्षी शाहू चौकातून आत शामरावनगरला रस्ता जातो. त्याची सुरुवातच गटारीतून होते. ही रस्त्याच्या एका बाजूला असलेली गटार सांगलीतील सगळ्यात जास्त लांबीची असावी. प्रत्येक गल्लीत अशीच उघडी गटारं आहेत. नुसती ही गटारं धड केली तरी शामरावनगरची सुधारणा होईल. पण ते काही होत नाही. बळी गेले तरी होत नाही. काही कॉलनीत रस्ते झालेत, पण गटार नाही. गटारं झाली, पण ती उंचीनं उंबरठ्यावर. रस्ते आहेत, पण तेही घराच्या पायर्‍यांच्या वर. परिणामी, सारं पाणी घरात.

जय गणेश कॉलनीत काटेरी झुडपांनी भरलेली खुली जागा आहे. अभिनव हायस्कूलचं सारं पार्किंग रस्त्यावरच. महाराष्ट्र कॉलनी म्हणजे काटेरी झुडपांनी भरलेली कॉलनी. आनंद कॉलनीत तर भयंकर दलदल. महादेव मंदिर कॉलनीत दांडगं तळं आणि त्यात सापापासून बदकांपर्यंत सारी गुण्यागोविंदानं नांदतात. असंच एक तळं आदिती कॉलनीतही. विश्वविनायक चौकातून आत गेल्यावर टॉवरला लागून भयंकर काटेरी झुडपे आणि पाऊलवाट. सहारा कॉलनी तळ्यात आणि झुडपात वसलेली कॉलनी. रॉयल- मॉडर्न – सुंदर अशी नावं असलेल्या कॉलनीची गतही अशीच.

तीन-चार हजारात गुंठा मिळतोय म्हटल्यावर गुंतवणूक म्हणून प्लॉट घेतलेले जागेचे मालक आता सापडतच नाहीत. कुणी अमेरिकेत वॉशिंग्टनला, तर कुणी दुबईत. ते कधी इकडं फिरकतच नाहीत. त्यांचे प्लॉट मात्र काटेरी झुडपं आणि साचलेल्या पाण्यांनी सारा भाग खराब करतात. त्यांच्यावर कधीच कारवाई का होत नाही?

भयावह वास्तव आणि हाणतात विकासाच्या गप्पा

गटारीत पडून तहुराचा बळी गेला; पण ही कहाणी कुण्या एका तहुराची नाही. ती सार्‍या शामरावनगरची तर आहेच; पण दलदलीत फसलेल्या, काटेरी झुडपांत अडकलेल्या, चालायला धड रस्ता नसलेल्या, उघड्या गटारीभोवती जगणार्‍या, मोकाट कुत्र्यांची दहशत असलेल्या, अंधारबुडूक भागात कसाबसा तग धरणार्‍या सार्‍या उपनगरांची आहे. ही सारी उपनगरं आणि तिथं राहणारी माणसं सांगलीकर आहेत की नाहीत? सांगलीच्या विकासात या माणसांची नोंद आहे की नाही? भारत विरुद्ध इंडिया अशी दरी सांगली आणि या माणसांतही आहे. ही दरी न मुजवता विकासाच्या गप्पा मारणं अमानवीच.

कलम 302 का लावू नये?

एका बालिकेचा गटारीत पडून बळी जातो. बळी जाईपर्यंत गटारी तुंबून राहिल्या असतील, तर पालिकेचा स्वच्छता विभाग काय, कसली आणि कोणाची स्वच्छता करत होता? आरोग्य अधिकारी काय करत होते? या भागातील लोकप्रतिनिधी काय करत होते? या सार्‍यांवर कलम 302 का लावू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त झाली. याअगोदरही या भागात अशा गंभीर घटना घडल्या. दोन बळी गेले. त्यानंतरही यंत्रणेला मूलभूत सुविधांचे गांभीर्य नसेल, तर परिस्थिती गंभीरच नाही, तर संतापजनक असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली.

पगार खाणारी महापालिका करते काय?

इथं महापालिका आहे. तिचं कोट्यवधीचं बजेट. ती हाकायला भली दांडगी प्रशासकीय पगारी यंत्रणा. लाखोंचे पगार कधीही तटत नाहीत. यंत्रणेनं काम केलं नाही, तर जाब विचारायला लोकांनीच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत. हजार योजना आणि त्यासाठी करोडोचं बजेट आणि तरीही उपनगरांत गटार नाही, वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही. मग हे सारं करोडोचं गणित कुणासाठी आहे? कशासाठी आहे?

Back to top button