Almatti Dam : …अन्यथा १५ ऑगस्टपर्यंत महापुराचा धोका : विजयकुमार दिवाण | पुढारी

Almatti Dam : ...अन्यथा १५ ऑगस्टपर्यंत महापुराचा धोका : विजयकुमार दिवाण

विटा : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील धरणांच्या परिचलनाकडे लक्ष द्या, अन्यथा १५ ऑगस्टपर्यंत पुन्हा एकदा महापुराचा धोका  संभवतो, असा इशारा कृष्णा नदी महापूर नियंत्रण नागरी समितीचे निमंत्रक निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी दिला आहे. याबाबत आज (दि. ४) दिवाण यांनी राज्य सरकारला निवेदन दिले आहे. (Almatti Dam)

अलमट्टी धरणासह (Almatti Dam)  कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या परिचलनाकडे राज्य शासन आणि जलसंपदा विभाग यांनी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व धरणातून विसर्ग होतो की नाही, यावर बारकाईने लक्ष दिले पाहिजे. आणि तसा विसर्ग होत नसेल, तर त्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

सध्या अलमट्टी धरणात ५१९.२५ मीटर पातळीपर्यंत पाणी साठले आहे. पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यासाठी आता फक्त तीनशे पन्नास मिलिमीटरची कमतरता आहे. या धरणाची पाणी साठवण्यासाठीची उंची ५१९.६० मीटर असून १२३.०८ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. सध्या अलमट्टी धरणामध्ये ११७. ३ टीएमसी पाणी साठलेले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अलमट्टी धरण फुल्ल भरणार आहे. ते धरण भरले की महापुराचा धोका निश्चितच वाढणार आहे.

कोयना, वारणा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, चांदोली आणि अन्य सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. कोयना धरणात सध्या ७९.७० टीएमसी आणि वारणा धरणामध्ये २९.१७ टीएमसी पाणी आहे. परंतु पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, तर ही दोन्ही धरणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे लवकरच भरतील. मग विसर्ग प्रचंड प्रमाणात वाढवावा लागेल.

त्याचवेळी अलमट्टी धरणातून विसर्ग कमी असेल, तर शंभर टक्के महापुराचा धोका संभवतो. त्यामुळे राज्य शासन, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सध्या महापूर रोखण्याऐवजी महापूर आल्यानंतर आपत्ती निवारणासाठी काय उपाययोजना करायचे, याकडेच सगळे लक्ष देत आहे. वास्तविक महापूर येऊ नये, यासाठीच आता तातडीने आणि गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत. अन्यथा १५ ऑगस्टपर्यंत महापुराचा धोका संभवतो असेही दिवाण यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button