राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : कडेगाव मोहरम

कडेगाव : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका कराड-विटा मार्गावरील अंदाजे पंधरा ते वीस हजार लोकवस्ती असलेले एक गाव. या गावानेच मोहरमच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्य घडवून जनतेसमोर आदर्श निर्माण केला आहे. गगनचुंबी ताबुतांचा उत्सव साजरा करणारे कडेगाव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हा सण शनिवार (दि. 29) रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त खास लेख…
येथील मोहरम ब्राह्मण समाजातील संस्थानिक श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे यांनी सुरू केला. सन 1885 पासून येथे उंच ताबूत बसवण्यात येतात. येथील संस्थानिक भाऊसाहेब देशपांडे यांचा कराड येथील मोहरम सणात अपमान झाला. त्यानंतर त्यांनी आपण कडेगाव येथे कराडपेक्षाही उंच ताबुतांची यात्रा भरवू, असा निश्चय केला व उंच ताबूत करण्यास प्रारंभ केला. त्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले. घरे, जमिनी दिल्या. तेव्हापासून मोहरमला वेगळी दिशा प्राप्त झाली.
बकरी ईदनंतर ताबुतांच्या बांधणीला सुरुवात होते. प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली जाते. हिंदू-मुस्लीम बांधव खांद्याला खांदा लावून ताबुतांची बांधणी करतात. या ताबुतांची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण असते. आधी कळस मग पाया यानुसार त्यांची बांधणी केली जाते. मोहरमनिमित्त मानाचा सातभाई, देशपांडे, हकीम, बागवान, शेटे, पाटील, अत्तार, इनामदार, तांबोळी, सुतार, माईनकर, मसूदमाता ताबूत व पंजे बारा इमाम पंजे असे एकूण 14 ताबूत बसविले जातात. त्यापैकी निम्मे हिंदूचे असतात. गावचे सर्व मुस्लिम बांधव हिंदू बांधवांच्या सणात व हिंदू बांधव मुस्लिमांच्या सर्व सणांत सहभागी होतात.
कडेगावचे ताबूत गगनचुंबी म्हणून विख्यात आहेत. पूर्वी हे ताबूत गोल आकाराचे असत. सध्याच्या ताबुतांचा आकार अष्टकोनी आहे. कळकाच्या (बांबूच्या) सहायाने अष्टकोनी आकाराचा सांगाडा तयार करून, नंतर त्यावर रंगबेरंगी कागद लाऊन सजावट केली जाते. ताबुतांच्या उंचीसाठी एकमेकात चढाओढ असते. ताबूत बांधण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कोठे ही गाठ दिली जात नाही.
आधी कळस मग पाया अशी त्याची उभारणी असते. एक ताबूत खांद्यावरून नेण्यासाठी दोनशे लोक लागतात. ताबूत नेताना अडथळा होऊ नये म्हणून विजेच्या तारा काढून टाकल्या जातात.
आकर्षक सोंगे आणि काव्यरचना
मोहरममधील काव्यरचनेतून हिंदू-मुस्लीम ऐक्य कडेगावचे थोर संत सय्यदपीर साहेबहुसैन पिरजादे यांनी घडवून आणले. त्यांनी रचलेल्या काव्याला भारतीय संगीताची साथ असून मोहरमच्या सणादिवशी ती काव्य गायिली जातात. त्यासाठी बुधवार पेठ मेल आणि शुक्रवार पेठ मेल अशा दोन पार्ट्या आहेत. यांच्यात ही जुगलबंदी होती. त्यात बैरागी सोंग, भाट सोंग, जोगी, नानकशा असे विविध प्रकार आहेत. हा कार्यक्रम पाच दिवस असतो. त्याचबरोबर करबल हे आकर्षक सोंग आहे. मोहरमची काव्यरचना पूर्णपणे हिंदीमधून असून, ती हिंदी व मुस्लीम धर्मातील देव-देवदेवतांवर आधारली आहे. करबल या सोंगामध्ये हिंदूंचा जास्त समावेश असतो. प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा, हिंदू-मुस्लीम एक रहेंगे, ऐकीसे सागर पार करेगे… अशा प्रकारची दीडशे वर्षापूर्वी रचलेली गीते आजही गायली जातात. तर मोहरम भेटी सोहळा पाहण्यासाठी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, बेंगलोर,महाराष्ट्रातील तसेच कर्नाटकातील कानाकोपर्यातून हजारो लोक खास या सणासाठी कडेगावला येतात.
कडेगावचा आदर्श इतरांनी घ्यावा
मोहरम सणासाठी कोणाकडूनही वर्गणी घेतली जात नाही हे येथील मोहरमचे आगळे वैशिष्ट्ये आहे. या देशात राष्ट्रीय एकात्मता राखायची असेल, तर सर्वप्रथम हिंदू-मुस्लिम यांच्यासह सर्वधर्मात ऐक्य होणे अत्यंत गरजेचे आहे. कडेगावच्या हिंदू-मुस्लिम बांधवांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवल्यास ते शक्य होईल, असे वाटते. प्रत्येकाने आपल्या धर्माचा आदर्श बाळगून इतरही धर्मांबद्दल आदर बाळगला तर जातीय दंगे, वितुष्ट येणार नाही.