सांगली : इस्लामपुरात भाजप अ‍ॅक्शन मोडवर; निशिकांत पाटील यांच्या निवडीने आ. जयंत पाटील यांना आव्हान | पुढारी

सांगली : इस्लामपुरात भाजप अ‍ॅक्शन मोडवर; निशिकांत पाटील यांच्या निवडीने आ. जयंत पाटील यांना आव्हान

इस्लामपूर;  मारुती पाटील :  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक निशिकांत पाटील यांना जिल्हाध्यक्षपद देवून भाजपने येथे आ. पाटील यांना आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडीने इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजप अ‍ॅक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भविष्यात येथे भाजप व राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत.

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, बाबासो सूर्यवंशी, सी. बी. पाटील यांच्यानंतर आता निशिकांत यांच्या रुपाने वाळवा तालुक्याला चौथ्यांदा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली. यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष व आत्ताचे जिल्हाध्यक्ष यांच्या निवडीनंतरच्या तालुक्यातील राजकीय परिस्थितीत खूप फरक आहे. यापूर्वी भाजपची तालुक्यात मोजकीच ताकत होती. आता मात्र ही ताकत वाढत आहे. भाजप पक्ष गावागावात विस्तारू लागला आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीचा भाजप हाच प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे.

माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, स्व. विलासराव शिंदे, स्व. नानासाहेब महाडिक, स्व. एम. डी. पवार, स्व. अशोकराव पाटील, बाबासो सूर्यवंशी, माजीमंत्री सदाभाऊ खोत, वैभव नायकवडी, अभिजित पाटील, सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील तर अलिकडच्या काळातील निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, विक्रम पाटील, गौरव नायकवडी, वैभव पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे मतदारसंघातील प्रमुख विरोधक राहिले आहेत. या सर्वांनी विधानसभा निवडणुकीत आ. जयंत पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु 2009 चा अपवाद वगळता गेल्या 35 वर्षात येथे विरोधकांना जयंत पाटील यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यास यश आलेले नाही. हिच आ. जयंत पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणाची खासियत आहे.

2019 च्या विनासभा निवडणुकीतही जयंत पाटील यांच्याविरोधात वातावरण निर्मिती करण्यात विरोधकांना बर्‍यापैकी यश आले होते. या वातावरण निर्मितीला इस्लामपूर पालिकेतील सत्तांतरणाची किनारही होती. माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात विधानसभेसाठी जोरदार तयारीही केली होती. मात्र ऐनवेळी भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेला गेल्याने निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली. तर युतीतर्फे गौरव नायकवडी यांनी निवडणूक लढविली. त्यामुळे या तिरंगी लढतीत जयंत पाटील यांचा विजय सुखर झाला. त्यावेळी युतीच्या जागा वाटपात इस्लामपूर मतदारसंघ भाजपला जाऊ नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाल्याची चर्चाही मतदारसंघात होती.

आ. जयंत पाटील व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांतील सख्यही जगजाहीर आहे. त्यामुळे भाजप या मतदारसंघात जास्त लक्ष घालत नसल्याची चर्चाही आहे. आता मात्र राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतरही आ. जयंत पाटील हे भाजपसोबत न जाता शरद पवार यांच्याशीच एकनिष्ठ राहिले आहेत. त्यामुळे भविष्यात भाजप आता आ. जयंत पाटील यांना मतदारसंघातच रोखण्याचा प्रयत्न करणार, हे स्पष्ट दिसत आहे. त्याच दृष्टीने जयंत पाटील यांचे मतदारसंघातील प्रमुख विरोधक निशिकांत पाटील यांना भाजपने जिल्हाध्यक्षपद देवून येथे पक्षाची ताकद वाढविण्याबरोबरच निशिकांत पाटील यांना बळ देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात येथे राष्ट्रवादी व भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होणार, हे मात्र निश्चित !

अजित पवारही देतील ताकद?

राष्ट्रवादी पक्षात वर्चस्वावरून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फारसे सख्य नव्हते, हे आता जगजाहीर झाले आहे. पक्ष फुटीनंतर आता अजित पवार व जयंत पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो. त्यातूनच भविष्यात अजित पवार हेही जयंत पाटील यांच्या पराभवासाठी प्रयत्न करू शकतात, ही शक्यताही नाकारता येत नाही. येथे विरोधकांना अजित पवारांचीही रसद मिळू शकते.

गटबाजी रोखण्याचे आव्हान…

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले निशिकांत पाटील यांनी मतदारसंघात भाजप पक्ष वाढविण्याबरोबरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयत पाटील यांच्या वर्चस्वाला शह देण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र भाजप पक्षातच अनेक गट कार्यरत असल्याने येथे पक्षाच्या वाढीलाही काही मर्यादा येत आहेत. पक्षातील ही गटबाजी थांबवून सर्वांना सोबत घेवून पक्षाचा विस्तार वाढविण्याचे आव्हान निशिकांत पाटील यांच्यासमोर असणार आहे.

Back to top button