राज्यातील बहुतांश पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे; राजकारणाचे गुन्हेगारीकरण | पुढारी

राज्यातील बहुतांश पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे; राजकारणाचे गुन्हेगारीकरण

मोहन यादव

सांगली :  राज्यातील राजकारण ‘मनी’ आणि ‘मसल’ पॉवरने व्यापले आहे. सर्वच प्रमुख पक्षांच्या शेकडो उमेदवार, आमदार, खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी जगताशी अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहेत. तसेच अनेक नेत्यांनी राजकारणातून कोट्यवधी, अब्जावधींची माया गोळा केली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच (एमइडब्लू) या संस्था देशभरातील निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिज्ञापत्रे व अन्य माहितीच्या आधारे सर्वेक्षण करतात. यापूर्वी या संस्थांनी विविध पक्षांना उद्योगपतींकडून मिळत असलेली कोट्यवधींच्या अधिकृत देणगीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. विविध राज्यातील अनेक नेत्यांच्या जाहीर असलेल्या मालमत्तेची जनतेसमोर पोलखोल केली आहे.

या संस्थांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण व संपत्ती यावर प्रकाशझोत टाकला आहे. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 2004, 2009, 2014, 2019 व त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतील एकूण 14 हजार 117 उमेदवार व एक हजार 326 खासदार, आमदारांंच्या तपशीलांचे विश्लेषण केले आहे. 14 हजार 117 पैकी 3668 (26 टक्के) जणांवर साधारण व 2321 (16 टक्के) उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 1326 आमदार, खासदारांपैकी 715 (54 टक्के) जण गुन्ह्यात अडकले आहेत. 422 (32 टक्के) लोकप्रतिनिधींचा गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे यात गुन्हे दाखल नसलेले केवळ सहा टक्के उमेदवार निवडून आले आहेत. गुन्हेगार असलेले 19 टक्क्यांनी विजय खेचून आणला.

पक्षांचे गुन्हेगारांना पाठबळ

बहुतांश पक्ष गुन्हेगार उमेदवारांनाच पाठबळ देत आहेत. निरीक्षण केलेल्यात भाजपच्या 727 उमेदवारांपैकी 395 जण साधारण व 216 जणांचा गंभीर गुन्हे दाखल असलेल्यात समावेश आहे. याशिवाय 386 पैकी 227 साधे व 129 आमदार, खासदारांनी स्वत:वर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात मान्य केले आहे. अशीच स्थिती काँग्रेसची आहे. काँग्रेसच्या 835 मधील 306 उमेदवारांवर अदखलपात्र व 157 जण दखलपात्र गुन्ह्यात आहेत. निवडून आलेल्या 267 पैकी 95 जणांवर गंभीर व 45 आमदार, खासदारांवर अतिगंभीर केसेस दाखल आहेत. शिवसेनाही यात मागे नाही. सेनेकडून निवडणूक लढविलेल्यांतील 773 पैकी 711 जण गुन्हेगार आहेत. 283 मधील 200 आमदार, खासदारांचा सर्वसाधारण व 125 जणांचा गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. याशिवाय राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या 700 पैकी 311 व 191 जण गुन्ह्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अडकले आहेत. याबरोबरच 250 आमदार, खासदारापैकी 107 व 64 जणांवर विविध प्रकारचे खटले दाखल आहेत. बसपा, आपच्या काही नेत्यांचाही ऐनकेन प्रकारे गुन्हेगारीशी संबंध आला आहे.

अबब… कशी जमवली ही माया ?

विश्लेषण केलेल्या 14 हजार 117 उमेदवारांची सरासरी मालमत्ता 2.65 कोटी रुपये आहे. 40 उमेदवार अब्जाधीश आहेत. 1326 आमदार, खासदारांची संपत्ती 10.68 कोटी तर यातील 26 जण अब्जाधीश आहेत. यामध्ये सर्वच पक्षाचे नेते आघाडीवर आहेत. प्रामुख्याने भाजपच्या 386 नेत्यांची मालमत्ता 14.39 कोटी आहे. काँग्रेसच्या 267 खासदार, आमदारांची संपत्ती 8.60 कोटी आहे. शिवसेनेच्या 283 जणांची 7.19 कोटी तर राष्ट्रवादीच्या 250 लोकप्रतिनिधींनी सरासरी 9.89 कोटींची माया जमविली आहे. 63 अपक्ष नेत्यांची सरासरी 7.60 कोटी मालमत्ता आहे.

महिलांही आघाडीवर

गुन्हेगारी जगताशी संबंध व संपत्ती जमविण्यात महिला नेत्यांही आघाडीवर आहेत. 2004 पासून आजपर्यंत उमेदवारी केलेल्या
933 पैकी 151, तर 95 आमदार, खासदारमधील 32 महिलांवर गुन्हे दाखल आहेत. उमेदवारी केलेल्या महिलांची सरासरी मालमत्ता
2.90 कोटी व निवडून आलेल्यांची 14.90 कोटी आहे.

Back to top button