NCP Sangli : रूपाली चाकणकरांचा दौरा; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

NCP Sangli : रूपाली चाकणकरांचा दौरा; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

इस्लामपूर: पुढारी वृत्तसेवा : महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर या शुक्रवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आंदोलन करतील, अशी शक्यता असल्याने जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव आणि महिला कार्यकर्त्यांना इस्लामपूर पोलिसांनी खबरदारी म्हणून ताब्यात घेतले. यावेळी पोलीस व महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. आम्ही पक्षाच्या बैठकीसाठी सांगलीला जात असताना पोलिसांनी विनाकारण आम्हाला ताब्यात घेवून दोन तास पोलीस ठाण्यात ठेवले. त्यामुळे बैठकीला जाता आले नाही, असा आरोप जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव यांनी केला.

रुपालीताई चाकणकर या शुक्रवारी सांगली येथे आढावा बैठकीसाठी येणार होत्या. दरम्यान, चाकणकर यांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करुन अजित पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चाकणकर यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या त्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयातून जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देसामाने, शहराध्यक्षा रोझा किणीकर व अन्य महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात नेले.

दरम्यान, आम्ही सांगली येथे पक्षाच्या बैठकीला जाण्यासाठी कार्यालयात एकत्रित जमलो होतो. रुपालीताई चाकणकर या जिल्हा दौऱ्यावर येणार अल्याने जिल्ह्यातील बंद असलेले महिला समपुदेशन केंद्रे सुरु करावीत, अशा मागणीचे निवेदन त्यांना देणार होतो. यात आंदोलन करण्याचा विषयच नव्हता. तरीही पोलिसांनी विनाकारण आम्हाला ताब्यात घेतले. त्यामुळे आम्हाला वेळेत बैठकीला जाता आले नाही, असा आरोप सुश्मिता जाधव यांनी केला आहे. पोलीस ठाण्यात बराच वेळ राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व पोलीस अधिकारी यांच्यामध्ये खडाजंगी सुरु होती.

हेही वाचा 

Back to top button