सांगली : उद्योग, व्यापारात मागे; महसुलात पिछेहाट | पुढारी

सांगली : उद्योग, व्यापारात मागे; महसुलात पिछेहाट

सांगली; उध्दव पाटील : जिल्ह्याचा परिक्षेत्रनिहाय जीएसटी महसूल पाहिल्यास उद्योग, व्यापार, व्यवसायात प्रगती करणारा भाग आणि पाठीमागे पडत असलेला भाग याचे चित्र स्पष्टपणे समोर येते. तासगाव, पलूस, कडेगाव या पट्ट्याची चांगली वाढ होत आहे. नजीकच्या भविष्यातही वाढीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी या तालुक्यांमधील उद्योग, व्यवसाय, व्यापार वाढीसाठी मात्र शासनाने प्रयत्नपूर्वक ‘बूस्टर’ देण्याची गरज आहे.

सन 2021-22 या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्याचा जीएसटी महसूल 907 कोटी रुपये होता. 2022-23 मध्ये तो 1 हजार 93 कोटी रुपये झाला. जीएसटी महसुलात 186 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ जोरात असली तरी ती ठराविक पट्ट्यातील आहे. सांगली शहर, वसंतदादा औद्योगिक वसाहत, सांगली पश्चिम भाग या पट्ट्यातून 468 कोटी रुपये, मिरज एमआयडीसी, कुपवाड एमआयडीसी, मिरज शहर व मिरज पूर्व भाग या पट्ट्यातून 282 कोटी, तासगाव, पलूस, कडेगाव या पट्ट्यातून 204 कोटी रुपये, वाळवा आणि शिराळा या बेल्टमधून 83 कोटी रुपये, तर जत, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ या बेल्टमधून 56 कोटी रुपये इतका जीएसटी महसूल जमा झाला आहे. वस्तू आणि सेवा पुरवठा यावरील करातून ही रक्कम जमा झालेली आहे.

सांगली शहरातील व्यापार व व्यवसाय, वसंतदादा सहकारी औद्योगिक वसाहतामधील उद्योग, वसंतदादा कारखाना, मार्केट यार्ड, फळे व भाजीपाला मार्केट येथील उलाढाल त्यावरील जीएसटी, शासकीय कार्यालयांचे मुख्यालय सांगलीत असल्याने विविध कामांवरील जीएसटी त्यातून जमा होणारी रक्कम पाहता सांगली शहर परिक्षेत्र हे जीएसटीमध्ये जिल्ह्यात अव्वल आहे. खरे तर एखादा-दुसरा मोठा उद्योग आला असता तर महसुलात आणखी वाढ झाली असती.

मिरज एमआयडीसी, कुपवाड एमआयडीसी, मिरज शहर व मिरज पूर्व भागातून 282 कोटी रुपये जीएसटी महसूल जमा झाला आहे. या पट्ट्यातही उद्योगांच्या वाढीला मोठा वाव आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कवलापूर विमानतळाचा विषय फार कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. भागाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी अधिक सजग होणे गरजेचे आहे.

कनेक्टिव्हीटी वाढली…!

तासगाव, पलूस, कडेगाव या बेल्टमधील जीएसटी महसूल लक्ष वेधून घेतो. ‘मिरज-कुपवाड’ या बेल्टनंतर ‘तासगाव-पलूस-कडेगाव’चा नंबर लागत आहे. या पट्ट्यात उद्योग, व्यवसाय व सेवा पुरवठा याची चांगली वाढ होत आहे. शिरवळ एमआयडीसी तसेच कोल्हापूर एमआयडीसीतील उद्योगांना लागणारा कच्चा माल, सेवा पुरवठा या भागातून होत आहे. रस्त्याची कनेक्टिव्हीटी वाढल्याने याठिकाणी छोटे उद्योग उभारी घेत आहेत, असे जाणकारांनी सांगितले. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यातही या पट्ट्यात उद्योग, व्यवसायांची वाढ चांगली होईल, असे संकेतही मिळत आहेत. साखर निर्यातीला जीएसटी माफ आहे. ते एक कारण सन 2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये महसुलात 6 कोटींच्या घटीस कारणीभूत असल्याचे दिसत आहे. मात्र, एकूण या बेल्टची उद्योग, व्यवसायातील वाढ चांगली आहे.

…तीन एमआयडीसी प्रस्तावित

कोल्हापूरच्या आजूबाजूला 3 ते 4 एमआयडीसी प्रस्तावित असल्याचे समजते. त्याचा लाभ वाळवा-शिराळा पट्ट्याला होईल. मोठ्या उद्योगांना कच्चा माल पुरवणारे उद्योग या भागात सुरू होतील, अशी चर्चा आहे. सध्याही वाळवा-शिराळा पट्ट्यात उद्योग-व्यवसायाकडे कल वाढला आहे. येणार्‍या काही दिवसांत या परिसरात उद्योग, व्यवसायात चांगली वाढ झाल्याचे पाहावयास मिळेल, असा आशावाद जाणकारांचा आहे.

दुर्लक्षित पट्ट्याकडे लक्ष कधी?

जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कवठेमहांकाळ हा पट्टा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पण आता म्हैसाळ, टेंभू या उपसा सिंचन योजनेमुळे या भागात बागायती क्षेत्र वाढू लागले आहे. त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. या भागात शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढल्यास शेतीमालाला चांगला दरही मिळेल आणि उद्योग, व्यवसाय, व्यापारही वाढेल. सध्या या पट्ट्यात दोन-चार कारखाने सोडले तर उद्योगधंदेच नाहीत. एखादा मोठा उद्योग जरी आला तर त्याला कच्चा माल पुरवठा करणारे लहान-छोटे उद्योग, सेवा पुरवठा करणारे व्यवसाय सुरू होतील. रोजगार निर्मिती होईल. परिसराच्या भरभराटीला सुरूवात होईल. त्यादृष्टीने शासनाने या भागाच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय ग्रीनफिल्ड, ड्रायपोर्ट, विमानतळ, उद्योग

भारतमाला परियोजना फेज-2 अंतर्गत पुणे ते बेंगलोर हा ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग सांगली जिल्ह्यातून जात आहे. खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज या तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. या चार तालुक्यात मिळून या मार्गाची लांबी 74 किलोमीटर आहे. हा महामार्ग विकासाला मोठी चालना देणार आहे. पुण्याला दीड तासात, मुंबईला तीन-साडेतीन तासात, तर बेंगलोरला चार-साडेचार तासात पोहोचता येणार आहे. शेतमाल, उद्योग धंद्यांचा कच्चा माल व उत्पादनांसाठी हा महामार्ग महत्वाचा ठरणार आहे. या महामार्गावर मालवाहतूक विमान तसेच एअरफोर्सची विमाने आपत्कालीन स्थितीमध्ये उतरविण्यासाठी धावपट्टी बांधली जाणार आहे. रांजणी येथे ड्रायपोर्टची उभारणीही गतीने होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण झाले आहे. आता ड्रायपोर्ट आणि कवलापूरचे विमानतळ झाल्यास तसेच मोठे उद्योग आल्यास खर्‍या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.

Back to top button