सांगली : टेंभूच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू | पुढारी

सांगली : टेंभूच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

विटा ; पुढारी वृत्तसेवा : टेंभूच्या साठलेल्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज शनिवारी दुपारी तीन वाजता तामखडी – खरसुंडी रस्त्यावर बलवडी (खा) जवळ टेंभू योजनेच्या व्हाॅल्व नजीक साठलेल्या पाण्यात अंघोळीस उतरल्या मुळे घडली. मुन्ना लखन यादव (वय – ३२ रा.लोकाई, कोडरमा ( झारखंड) असे त्याचे नाव आहे. याबाबत खानापूर पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बलवडी (खा) , मेंगाणवाडी, खरसुंडी या तीन गावच्या सीमेवर टेंभू योजनेच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. बलवडी (खा) येथून पळशीकडे जाणाऱ्या मुख्य पाईप लाईनच्या भवानी तलावाकडे जाणाऱ्या व्हाल्वजवळ काम सुरू होते. सध्या पाचव्या टप्प्याचे पाणी चालू आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पाणी साठले आहे. या ठिकाणहून सबलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पोकलेन मशीनने चर काढण्याचे काम सुरू आहे. आज शनिवारी दुपारी तीन वाजता पोकलेन चालक मुन्ना यादव साठलेल्या पाण्यात आंघोळीस उतरला. पाण्यात उतरताच भोवरा निर्माण झाल्याने भवानी तलावाकडे जाणाऱ्या पाईपमध्ये तो अडकला. त्यावेळी त्याच्यासोबत असणारा सहकारी याने त्याला ओढून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. मुन्ना यादवचा बुडून मृत्यू झाला.

Back to top button