मिरज : चोरी करायला गेला अन विहिरीत पडला | पुढारी

मिरज : चोरी करायला गेला अन विहिरीत पडला

मिरज : पुढारी वृत्तसेवा :  एरंडोली (ता. मिरज) येथे एका ठिकाणी चोरी करायला गेलेल्या चोरट्याची चांगलीच फजिती झाली. चोरीचा डाव फसताच पलायनाच्या प्रयत्न असताना तो थेट पडक्या विहिरीत पडला. किटू आनंदराव काळे (वय २१, रा. एरंडोली) असे त्याचे नाव आहे.

एरंडोली येथे राहणाऱ्या विशाल बाळासो पाटील यांच्या शेतामध्ये विहीर खोदाईचे काम करण्यात येत आहे. या ठिकाणी विहीर खोदाई करणारे कामगार राहण्यास आहेत. कामगारांच्या झोपडीत चोरी करण्यासाठी किटू हा बुधवारी मध्यरात्री गेला होता. तो चोरीच्या प्रयत्नात असताना कामगारांच्या झोपडीवर टाकलेल्या प्लास्टिकच्या कागदाचा आवाज झाला. त्यामुळे झोपडीतील कामगार सतर्क झाले. त्यांनी तातडीने बाहेर येऊन पाहताच किटू चोरीसाठी आला असल्याचे कामगारांना संशय आला.

कामगार झोपडी बाहेर आल्याचे पाहताच त्याने पलायन केले. कामगारांनी देखील त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी अंधारात पळत असताना किटू काळे हा शेजारील एका पडीक विहिरीमध्ये पडला. त्यानंतर कामगारांनी त्यास पकडले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात किटू काळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button