अरेरे… मुलीच्या वाढदिवशी तांबवेचा जवान ठार | पुढारी

अरेरे... मुलीच्या वाढदिवशी तांबवेचा जवान ठार

इस्लामपूर/ /नेलें : पुढारी वृत्तसेवा :  मुलीच्या वाढदिवसादिवशीच जवान असणारे वडील अपघातात ठार झाले. प्रथमेश बाळकृष्ण लोखंडे (रा. तांबवे, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे.

गेल्या महिन्यात सुट्टीवर आलेल्या प्रथमेश इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावर झालेल्या अपघातात ठार झाले. त्याचा मित्र शेखर कदम (रा. मसुचीवाडी) हा जखमी झाला. अपघात बुधवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. प्रथमेश बेळगाव येथील मराठा इंन्फट्रीमध्ये होते. ते सध्या बेंगलोर येथे सेवा बजावत होते. गेल्या महिन्यात ते तांबवे गावी सुट्टीवर आले होते. बुधवारी प्रथमेशच्या मुलीचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे साहित्य आणण्यासाठी ते वाघवाडीमार्गे इस्लामपूर येथे बुलेट (क्र.एम.एच. १०/ डीके – ७३५३) वरून मित्र शेखर कदमबरोबर येत होते. कदम बुलेट चालवत होते.

वाघवाडी रस्त्यावरील प्रतीक पेट्रोल पंपासमोर विजय शिवाजी पाटील मोटारगाडी (एम. एच. १०/ सीसी – ०९२७२) हॉटेलसमोर लावून जेवणाची पार्सल आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी साजिद हमीद मुल्ला मोटारगाडीत बसले होते. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील वीज गेली होती. पाऊस सुरू होता. याचदरम्यान वाघवाडीकडून आलेल्या प्रथमेश लोखंडे याची बुलेट थांबलेल्या मोटारगाडीवर जावून आदळली. यामध्ये लोखंडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना बेशुद्ध अवस्थेत कराड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जखमी कदम याला पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. लोखंडे यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Back to top button