सांगली : 84.77 कोटींचा व्हॅट थकविला; चार कंपन्यांवर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : 84.77 कोटींचा व्हॅट थकविला; चार कंपन्यांवर गुन्हा दाखल

सांगली, पुढारी वृत्तसेवा : पेठ (ता. वाळवा) येथील खाद्यतेल विक्री करणार्‍या चार कंपन्यांनी 84.77 कोटी रुपयांचा व्हॅट (मूल्यवर्धीत कर) थकवल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सन 2016 पर्यंतच्या थकबाकीची ही रक्कम आहे. स्टेट जीएसटीच्या सांगली कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी व्हॅट कायद्यांतर्गत ही कारवाई केली. कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

राज्य वस्तू व सेवाकर कार्यालय सांगली अंतर्गत नोंदीत असलेल्या मे. संतोष कुमार देशमाने, मे. महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, मे. महेश व्हेज ऑईल्स, मे.महालक्ष्मी ऑईल इंडस्ट्रीज यांच्याकडे एकूण 84.77 कोटी इतका मूल्यवर्धीत कर थकीत आहे. हे व्यापारी प्रामुख्याने खाद्य तेलाच्या फेरविक्रीचा व्यावसाय करत होते. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीसाठी वांरवार पाठपुरावा करून देखील थकबाकीची रक्कम त्यांनी भरली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2012 मध्ये संबंधीत व्यापा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीसलाही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्र शासनाने अभय योजना 2012 जाहीर केली. या योजनेचा फायदा घेण्यासाठी संबंधीत व्यापार्‍यांना कळविले तरीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या विरुदध इस्लामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य जीएसटीचे उपायुक्त सचिन जोशी (प्रशासन), उपायुक्त सुनील कानगुडे (नोडल) यांनी दिली.

मे. संतोष कुमार देशमाने या कंपनीचे प्रोप्रायटर संतोष देशमाने हे आहेत. त्यांच्याकडे सन 2011-12 व 2012-13 या कालावधीसाठी 1.42 कोटी इतकी थकबाकी होती. मे. महालक्ष्मी ट्रेडींग कंपनीच्या प्रोप्रायटर सुनिता संतोष देशमाने या आहेत. त्यांच्याकडे सन 2012-13, 2013-14 व 2014-15 या कालावधीसाठी 29.73 कोटी रुपये थकबाकी होती. मे. महेश व्हेज ऑईल्सचे प्रोप्रायटर महेशकुमार जाधव हे आहेत. त्यांच्याकडे सन 2012-13, 2013-14, 2014-15 व 2015-16 या कालावधीसाठी 16.90 कोटी रुपये थकबाकी होती. मे. महालक्ष्मी ऑईल इंडस्ट्रीजचे एचयूएफ- कर्ता संतोष विष्णू देशमाने हे आहेत. त्यांच्याकडे सन 2015-16, 2016-17 व 2017-18 या कालावधीसाठी 36.72 कोटी रुपये थकबाकी होती.

चारही कंपन्या संतोष देशमाने यांच्याशी संबंधीत आहेत. खाद्यतेलाच्या विक्रीबाबत विक्रीकर खात्याची अन्वेषण शाखा मुंबई यांच्याकडून या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कंपन्यांनी विक्रीकर चुकविल्याचे संबंधीत कारवाईत निष्पन्न झाले होते. त्यामुळे थकबाकी वसुलीपोटी राज्यकर सहआयुक्त सुनिता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त सुनिल कानगुडे, राज्यकर अधिकारी संजय माने यांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली आहे. पुढील तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.

थकबाकीदारांना सहआयुक्तांचा इशारा

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागांतर्गत प्रलंबित थकबाकी वसुलीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूर विभागातील सर्व थकबाकीदार व्यापार्‍यांनी त्यांच्याकडील थकबाकी तत्काळ भरावी; अन्यथा त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर विभागाच्या राज्य कर सहआयुक्त सुनीता थोरात यांनी दिला आहे.

Back to top button