तासगाव; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील सावळज येथील मंडप व्यवसायिक बाळू लोखंडे यांचे नाव लिहलेली लोखंडी खुर्ची इंग्लंडमधील मँचेस्टरच्या रेस्टाॅरंटपर्यंत पोहचली आहे. यानंतर आता लोखंडी खुर्ची पाहण्यासाठी इंग्लंडमधील मराठी जणांचा ओघ वाढू लागला आहे.
परंतू या लोखंडी खुर्चीबरोबर इंग्लंडमधील तरुणाईस सावळज येथील बाळू लोखंडे यांचीही भुरळ पडली आहे. लोखंडी खुर्चीच्या बरोबरीने त्यांचीही क्रेझ चांगलीच वाढलेली दिसत आहे.
मँचेस्टरमधील अल्ट्रिक्म भागामध्ये फिरताना सुनंदन लेले यांना एका रेस्टाॅरंटच्या परिसरात एक लोखंडी खुर्ची दिसली. खुर्चीच्या मागे नावं लिहलेलं आहे. या लोखंडी खुर्चीचा व्हिडीओ सुनंदन लेले यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्यानंतर तूफान व्हायरल झाला आहे.
सुनंदन लेले यांनी " बाळू लोखंडे सावळज " असं लिहलेल्या लोखंडी खुर्चीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला. काही तासातच व्हीडीओ सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरु झाली.