तासगाव ; दिलीप जाधव : आतापर्यंत आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेच्या खुर्चीच्या खुमासदार अशा चर्चा अनेकदा ऐकल्या. परंतू दोन दिवसांपासून अखंड भारतात आणि खासकरुन महाराष्ट्रात मात्र चर्चा सुरु आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळज या गावातील बाळू लोखंडे या मंडप व्यवसायिकाच्या एका लोखंडी खुर्चीची.
ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक सुनंदन लेले यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. मँचेस्टरमधील अल्ट्रिक्म भागात फिरत असताना त्यांना एका रेस्टॉरंटच्या परिसरात एक लोखंडी खुर्ची दिसली. या खुर्चीच्या मागे 'बाळू लोखंडे, सावळज' असं नावं लिहलेलं आहे.
सुनंदन लेले यांनी " बाळू लोखंडे सावळज " असं लिहलेल्या लोखंडी खुर्चीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला. काही तासातच व्हीडीओ सोशल मिडीयावर तूफान व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरु झाली.
सावळज येथील मंडप व्यवसायिक बाळू लोखंडेची लोखंडी खुर्ची तब्बल ७ हजार ६२७ किलोमीटरचा प्रवास करुन इंग्लंडमधील मँचेस्टरच्या हॉटेलात कशी पोहचली? याबाबत नेटकऱ्यांनी अनेक विनोदी तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे.
यानंतर मात्र आम्ही तासगाव तालुक्यातील सावळज गाव गाठले आणि भेट घेतली ती थेट या खुर्चीचे मालक बाळू लोखंडे यांची. त्यांच्याकडून जाणून घेतली लोखंडी खुर्चीच्या सावळजपासून ते मँचेस्टर पर्यंतच्या प्रवासाची कहाणी.
एका सामान्य कुटूंबातील मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या बाळू लोखंडे यांनी १५ वर्षापूर्वी स्वत:चा मंडप उभारणी व सजावटीचा व्यवसाय सुरु केला होता. अनेक कार्यक्रमांत जेवणासाठी टेबल व खुर्चीची मागणी व्हायला लागली. मंडप व्यवसायास जोडधंदा म्हणून केटरिंगचे साहित्यही आणले. त्यामध्ये लोखंडी खुर्च्या होत्या.
सदरच्या खुर्च्या त्यांनी १५ वर्षापूर्वी हुबळी कर्नाटक येथून घेतल्या होत्या. एका खुर्चीचे वजन १३ किलो होते. वजनाने अतिशय जड लोखंडी खुर्च्या नंतर मात्र हाताळण्यास जड वाटू लागल्या. काळाच्या ओघात ग्राहकही प्लॅस्टिक खुर्च्यांची मागणी करु लागले होते. यामुळे काही वर्षापूर्वी त्यानी लोखंडी खुर्च्या भंगारात कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथे १० रुपये किलो दराने विकून टाकल्या. काही खुर्च्या आजही आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत.
भंगारात विकलेल्या या खुर्च्या पुढे मुंबईपर्यंत गेल्या. नंतर एका परदेशी व्यवसायिकाने दुर्मिळ खुर्च्या म्हणून विकत घेतल्या. पुर्वीच्या काळातील मजबूत लोखंड असल्यामुळे यापैकी कांही खुर्ची मॅंचेस्टरच्या रेस्टॉरंट मालकाने विकत घेतल्या. या खुर्च्या ग्राहकांना बसायला ठेवल्या आहेत.
बाळु लोखंडेची लोखंडी खुर्ची लंडनमध्ये पाहिल्यानंतर सुनंदन लेलेंनी थेट बाळू लोखंडेना फोन केला. मॅंचेस्टरच्या मार्केटमध्ये एका मराठी माणसाच नाव पाहून मी भारावून गेलो. म्हणून हा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडोओ पोस्ट केल्यानंतर राज्यमंत्री विश्वजीत कदम, पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी मला संपर्क केला असे लेले यांनी फोनवरुन सांगितले. तर लंडनहून भारतात परत आल्यानंतर सावळजला भेट घ्यायला येणार असल्याचे सुनंदन लेलेनी सांगितले.
सुनंदन लेले यांनी ट्विट केलेल्या बाळू लोखंडे यांच्या खुर्चीच्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. खुर्ची सातासमुद्रापार कशी गेली याच सुरस कथा कमेंटमध्ये पोस्ट झालेल्या आहेत. काही युजर्सनी उपरोधिकपणे भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर परत जाताना ब्रिटिशांनी ही खुर्ची चोरून नेली असावी अशा शंका कमेंटमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. तर काहींनी ब्रिटिशांनी खुर्चीसुद्धा सोडली नाही, अशा गंमतीदार कमेंट केलेल्या आहेत.