पलूस; पुढारी वृत्तसेवा : बुर्ली (ता. पलूस) येथील सायली केतन पवार (वय 22) या विवाहितेचे शेजारच्या युवकाशी मोबाईलवरून चॅटिंग व त्याला भेटल्याच्या संशयावरून दीर कुणाल पवार (वय 28) याने गुरुवारी खून केल्याचे उघडकीस आले आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, शेजारचा युवक श्रेयश पवार यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सायली पवार या विवाहितेचा मृत्यू जिन्यावरून पडून झाल्याचा बनाव संशयिताने केला, मात्र तो उघड झाला. या प्रकरणी संशयित कुणाल पवार यास पलूस पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने दि.29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः सायली पवार घराशेजारी राहणारा तरुण श्रेयस पवार याच्याबरोबर मोबाईलवर चॅटिंग करीत होती. तसेच आदल्या रात्री तो तिला घरी येऊन भेटून गेल्याचे समजल्यावर संशयित दीर कुणाल पवार याने घरात तिच्या गळ्यावर, उजव्या व डाव्या हाताच्या मनगटावर धारदार हत्याराने वार केले. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कुणाल याने सायली ही जिन्यावरून पडल्याचा बनाव करून तिला रात्री सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मृतावस्थेत दाखल केले होते.
याच दरम्यान श्रेयस पवार यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कुणाल पवार विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा सायलीचा भाऊ सुरज सुधाकर नवगण (रा. बार्शी, जि. सोलापूर) याने फिर्याद दिली. पलूस पोलिस ठाण्यात खुनाचाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तासगाव येथील विभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव आणि सहकार्यांनी या खुनाचा उलगडा 24 तासांच्या आत केला आहे.