पुढारी ऑनलाईन डेस्क : रविंद्र जडेजा (5 बळी) आणि आर अश्विन (3 बळी) यांच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची दाणादाण उडवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने नागपूर कसोटीत आपली स्थिती मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 177 धावांत गारद झाल्यानंतर प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 गडी गमावून 77 धावा केल्या आहेत. रोहित नाबाद 56 आणि आर अश्विन 0 धावांवर क्रिजवर आहेत. भारत सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा 100 धावांनी मागे आहे.
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात रोहित आणि केएल राहुल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या पहिल्याच षटकात तीन चौकार मारून रोहितने आपले इरादे स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाने चौथ्या षटकातच नॅथन लायनकडे चेंडू सोपवला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र, पहिल्या दिवसाच्या शेवटच्या षटकांमध्ये टॉड मर्फीने ऑस्ट्रेलियाला यश मिळवून दिले. त्याने राहुलची विकेट घेतली. राहुल 71 चेंडूत 20 धावा करून बाद झाला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला. रविचंद्रन अश्विनने स्कॉट बोलंडला क्लीन बोल्ड करून कांगारू संघाचा डाव संपवला. बोलंडला आपले खातेही उघडता आले नाही. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 37 आणि अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. त्याचवेळी पीटर हँड्सकॉम्ब 31 धावा करून बाद झाला. या चौघांशिवाय एकाही कांगारू फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तीन खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच आणि अश्विनने तीन बळी घेतले. मोहम्मद शमी आणि सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय वेगवान गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली. दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला पायचित पकडले आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतरच्या पुढच्या तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला बाद लागोपाठ दुसरा झटका दिला. यावेळी कांगारूंची धावसंख्या 2 बाद 2 होती. यानंतर मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला आणि उपाहारापर्यंत विकेट पडू दिली नाही.
उपाहारानंतर जडेजाने आपल्या फिरकीची जादू दाखवली आणि 35 व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंत लबुशेन आणि रॅनशो यांना बाद करून भारताला यश मिळवून दिले. लबुशेनला केएस भरतने यष्टीचीत केले, तर रॅनशो पायचित झाला. त्यानंतर जडेजाने 42 व्या षटकात स्टीव्ह स्मिथला बोल्ड करून भारताला आणखी एक मोठे यश मिळवून दिले. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पाच बाद 109 धावांवर होती. स्मिथने 37 धावा केल्या. यानंतर अश्विनने आघाडी घेतली आणि अॅलेक्स आणि कमिन्सला बाद केले. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच जडेजाने पीटरला बाद केले. त्यानंतर अश्विनने स्कॉट बोलंडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांवर संपवला.