Khanapur : पोलिसांची मेहेरबानी झाली अन् तब्बल १७ वर्षांनी महिला घरी परतली! | पुढारी

Khanapur : पोलिसांची मेहेरबानी झाली अन् तब्बल १७ वर्षांनी महिला घरी परतली!

विटा; पुढारी वृत्तसेवा: पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने घर सोडलेल्या एका महिलेला केवळ पोलिसांची मेहेरबानी झाली आणि तब्बल १७ वर्षांनी महिला घरी परतली आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर (Khanapur) येथे संबंधीत महिला आपल्या कुटुंबात परतण्याची संधी मिळाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील टीआरपी येथे आरडाओरड करणारी महिला एका सामाजिक कार्यकर्त्याने पाहिली. तिच्याकडे चौकशी केली असता तिला काही आठवत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या महिलेला रुग्णालयात आणून तिची कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली.

त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार करून ती बरी झाल्यानंतर तिला प्रादेशिक मनोरुग्णालयात आणले. हळूहळू तिच्यात सुधारणा झाल्यानंतर तिच्याशी संवाद साधण्यात आला.

या महिलेने सांगितले की, काही काळ ती रत्नागिरी तालुक्यातील जयगड व लांजा तालुक्यांतील देवधे याठिकाणी वास्तव्यास होती. मात्र, या महिलेला आपले नाव, गाव सांगता येत नव्हते. काही दिवसांनी या महिलेने सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे आपले घर असल्याचे सांगितले.

त्यानंतर संबंधित त्या सामाजिक कार्यकर्त्याने तात्काळ याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस ठाण्याचे अंमलदार लक्ष्मण कोकरे, महेश कुबडे, रूपेश भिसे आणि सांगली पोलीस ठाण्याचे अधिकारी जालिंदर जाधव यांनी या महिलेच्या नातेवाइकांचा शोध घेतला.

महिलेची बहिण, भाचा आणि मुले रत्नागिरीत आली. ओळख पटविल्यानंतर त्या महिलेला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांची मेहरबानी झाली आणि तब्बल १७ वर्षांनी खानापूर (Khanapur) येथे महिला घरी परतली. यानंतर महिलेसह या कुटुंबातील सर्वांना आनंद झाला.

…अन अश्रू वाहू लागले..!

खानापूर येथील या महिलेला दोन मुले व एक मुलगी आहे. नातेवाईक भेटताच या महिलेने आपल्या बहिणीला व मुलीला लगेच ओळखले. काही वेळानंतर तिने मुलालाही ओळखले. मुलाला ओळखताच त्याने तिला मिठीच मारली. आपल्या आईला समोर पाहताच या मुलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहत होते. आईच्या भेटीने आनंदलेल्या मुलांनी पोलिसांचे शतशः आभार मानले.

हेही वाचलंत का? 

Back to top button