सांगली : मतीन काझीसह तिघेजण तडीपार | पुढारी

सांगली : मतीन काझीसह तिघेजण तडीपार

मिरज : पुढारी वृत्तसेवा : खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी मतीन काझी याच्यासह तिघांना प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार केले.
हद्दपार करण्यात आलेल्यामध्ये मतीन साहेबपीर चमनमलिक काझी (रा. टाकळी रस्ता, मिरज), अविनाश उत्तम काटकर (रा. रसूलवाडी, ता. मिरज) आणि अजय उर्फ अजित पांडूरंग खोत (रा. वडर कॉलनी, सांगली) या तिघांचा समावेश आहे.

युवा सेना समन्वयक मतीन काझी याने दोन महिन्यापूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याच्यावर मिरज शहर, महात्मा गांधी चौक व विश्रामबाग पोलिसात खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव दाखल होता.

सांगलीतील वडर कॉलनीमधील अजय खोत याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसात मारामारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे तीन गुन्हे दाखल असल्याने त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तर रसूलवाडी (ता. मिरज) येथील अविनाश काटकर याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायदा शास्त्र बाळगणे असे तीन गुन्हे दाखल असल्याने त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता.

Back to top button