सांगली; पुढारी वृत्तसेवा: मिरज येथील आस्था बेघर महिला केंद्रात एक आगळा- वेगळा विवाह (marriage) संपन्न झाला. या केंद्रात ६६ वयाची वधू (शालिनी) तर ७९ वयाचा वर (दादासाहेब साळुंखे) यांचा अनोखा विवाह पार पडला.
आस्था बेघर महिला केंद्रात यापूर्वी अनाथ निराधार मुलींची विवाह (marriage) पार पडले आहेत. परंतु, सध्या शालिनी (वय ६६) आणि निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे (वय ७९) यांचा विवाह पार पडला.
शालिनी यांच्या पती आणि मुलाचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या जीवनाची फरफट होत होती. तर दादासाहेब साळुंखे यांची मुले असून ती आपआपल्या वैवाहिक जीवनात सुखी होती.
या केंद्रात शालिनी आणि दादासाहेब या दोघांची ओळख झाली. दोघांनाही एकटेपणा जाणवत होता. यानंतर त्यांनी एकमेकांचे विचार, सुखदुःख वाटून घ्यायचा निर्णय घेतला. मुहूर्त ठरला. पै.पाहुणे बेघर केंद्रातील समदुःखी महिला होत्या.
वधू शालिनी (पाषाण, पुणे) आणि निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे हे (कवठे एकंद, ता. तासगाव) येथील आहेत. दोघांनी उज्वल भविष्यातील वाटचाल एकमेकांनी समजून घेऊन व्यतीत करायचं ठरलं. सर्व कायदेशीर सोपस्कार विधी पार पाडले.
परंपरेने चालत आलेल्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण व कालबाह्य झालेल्या पद्धतीला फाटा देत वयाचे बंधन झुगारून पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सोहळ्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी शुभ संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.
दिनदयाळ अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे, केंद्र संचालिका सुरेखा शेख, वंदना सवाखंडे, सखी वन स्टॉप सेंटरच्या अश्विनी नागरगोजे, रूपाली काळे, प्रतिभा भंडारे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शेडगे, सुरेश बनसोडे, सविता काळे, पूजा मोहिते यांनी यावेळी संयोजन केलं.
covid-19 च्या धर्तीवर सर्व दक्षता घेऊन वधूवरांना शुभ आशिर्वाद देण्यासाठी निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचलंत का?