Anil Parab : सोमय्यांनी नाहक बदनामी केली, न्यायालयात न्याय मिळेल | पुढारी

Anil Parab : सोमय्यांनी नाहक बदनामी केली, न्यायालयात न्याय मिळेल

मुंबई; पुढारी ऑनलाईन : Anil Parab किरीट सोमय्या यांनी माझी नाहक बदनामी केली आहे, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून न्यायालयात मला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

किरीट सोमय्यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्येवर भाष्य केले आहे. कर्मचाऱ्यांची आत्महत्या दुर्दैवी आहे, त्यांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, कोणीही आत्महत्या करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

Anil Parab : किरीट सोमय्यांना अखेर कोर्टात खेचले

विविध पक्षाच्या नेत्यांवर गैरव्यवहाराचे आरोप आणि तक्रारी करून चर्चेत असलेल्या भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अखेर महाविकास आघाडीचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोर्टात खेचले आहे.

खोटे आरोप करून बदनामी केल्या प्रकरणी परब यांनी उच्च न्यायालयात 100 कोटीचा मानहानीचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे .या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांनी मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्या घोटाळ्यांबाबत पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्याची मालिका सुरु केली आहे. अनिल परब यांना सातत्याने लक्ष्य करून अनिल देशमुख प्रकरणात परब यांचाही सहभाग असल्याचा दावा केला होता.

परब यांचे दापोलीतील हॉटेल तसेच परिवहन विभागातील बदल्यांच्या प्रकरणावरूनही सोमय्या यांनी गंभीर आरोप केले. याची गंभीर दखल घेत अनिल परब यांनी सोमय्या यांना 14 सप्टेंबर रोजी 72 तासाची नोटीस बजावून सर्व ट्विट डिलीट करण्याचा तसेच बिनशर्त माफी मागण्याचा इशाराही नोटीसीतून देण्यात आला होता.

माफी न मागितल्यामुळे दावा दाखल

मात्र, सोमय्या यांनी माफी न मागितल्यामुळे मंगळवारी परब यांच्यावतीने अँड. सुषमा सिंग यांनी उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे.

सोमय्या यांनी त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवर, आपल्या विरोधातील मजकूर हटवावा ,किमान दोन प्रमुख इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेच्या वृत्तपत्रांमध्ये जाहीररित्या बिनशर्त माफी मागावी. तसेच भविष्यात आपल्याविरोधात कोणतेही बदमानीकारक व्यक्तव्य करण्यापासून सोमय्या यांना मनाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंतीही परब यांनी या याचिकेत केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील बांधकामांसंदर्भात बदनामीकारक आणि अर्थहीन आरोप सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले होते. मात्र, त्या बांधकामांशी आपला कोणताही संबंध नाही. तसेच या कथित घोटाळ्यासंदर्भात आपल्याला संबंधित प्राधिकरणाकडून नोटीस बजावण्यात आलेली नाही.

सोमय्या यांनी केवळ बदनामीवर न थांबता आपल्यावर खंडणी वसूलीचेही आरोप केले आणि अटक कऱण्याची मागणीही केली. केवळ प्रसिध्दी मिळविण्यासाठी आणी आपली बदनामी करण्यासाठीच सोमय्या यांनी हा उद्योग केल्याने हा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button