मुंबई महापौर दालनासमोर भाजप नगरसेवकांची जोरदार निदर्शने | पुढारी

मुंबई महापौर दालनासमोर भाजप नगरसेवकांची जोरदार निदर्शने

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतील सर्व सभा प्रत्यक्ष घ्या व लसीचे दोन डोस घेतलेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी कोविडचे सर्व नियम पाळत मुंबई महापौर दालनाबाहेर जोरदार निदर्शने केली.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. राज्य शासनाने जास्त गर्दी होत असलेल्या मोहरमच्या मिरवणुकीस देखील परवानगी दिलेली होती. भारताचे सर्वोच्च सभागृह असलेली लोकसभा प्रत्यक्ष स्वरुपात होते.

मात्र महापालिकेच्या वैधानिक समिती सभा व विशेष सभा अद्यापही प्रत्यक्ष न घेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत. ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभेत कोण सदस्य काय बोलला हे नीट ऐकू येत नाही तसेच प्रतिध्वनी ऐकू येतो.

नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत. त्यामुळे सदर सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऐवजी प्रत्यक्ष घेणे आवश्यक असल्याची मागणी मुंबई महापौर दालनासमोर भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

Back to top button