नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत दरोडेखोर आहेत असून त्यांना परदेशातून पैसे पुरविले जात आहेत. त्यातून आंदोलन सुरू आहे, अशी गंभीर टीका भाजपचे उत्तरप्रदेशातील खासदार अक्षयवर लाल गोंड यांनी केली आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन सुरू आहे.
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये याआधी अनेकदा राडा झाला आहे.
किसान महापंचायतीनंतर, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत.
वादग्रस्त विधानं करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बहराईचचे भाजपा खासदार अक्षयवर लाल गोंड शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर गंभीर टीका केली आहे.
योगी सरकारला साडे चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बहराईचमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी गोंड यांनी टीका केली.
ते म्हणाले, 'राकेश टिकैत हे दरोडेखोर आहेत. शेतकरी आंदोलकांना परदेशातून पैसा मिळतो. शेतकरी आंदोलक पाकिस्तान, खलिस्तानवादी आहेत.
इतर देशांतून मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी पैसा पुरवला जात आहे. आंदोलनात शेतकरी नसून राजकीय पक्षाचे लोक सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांनी आंदोलन केले असते तर, फळ-भाज्या, दूध, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला असता पण तसे झालेले नाही.'
काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून मुझफ्फरनगरमध्ये 'किसान महापंचायत' आयोजित केली होती. या सभेत अल्ला हू अकबर आणि हर हर महादेव अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे त्यावर भाजपने ही किसान महापंचात नसून 'निवडणूक सभा' होत असल्याचे म्हटले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चा राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप देखील भाजपाने केला होता.
हेही वाचा :