कर्मवीर भाऊराव पाटील जंयतीविशेष : विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात शिक्षणाची क्रांती झाली. शिक्षण क्षेत्रात एक अजोड कार्य उभे राहिले. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सन १९१९ मध्ये स्थापन केलेल्या 'रयत'चा डोलारा बोधचिन्ह असलेल्या 'वटवृक्षा' प्रमाणेच आहे. रयतेला अज्ञानातून ज्ञानाच्या प्रवाहात आणणारे महामानव कर्मवीरांचे महान कार्य आहे. आपल्या कार्याने रयतेचे उद्धारकर्ते ठरलेल्या कर्मवीर अण्णांची आज जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त…!
कर्मवीरांनी बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा पोहोचवली. अवघ्या ५ विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही संस्था आजमितीस आशिया खंडातील
सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून दिमाखात वावरते आहे. स्वावलंबी शिक्षण आणि शिक्षणातून समाजोन्नती हा रयतचा मुख्य पाया आहे. कर्मवीरांनी ग्रामीण भागात जनशिक्षण संकल्पना अंमलात आणली.
'कमवा आणि शिका' ही योजना जागतिक पातळीवर पोहोचविणारे ते समाजप्रर्वतक होते. माणूसपण जपणारी आणि आत्मविश्वास निर्माण करणारी पिढी तयार करण्यात कर्मवीरांचा फार मोठा वाटा आहे हे कधी कोणी नाकारू शकणार नाही. त्यामुळेच देशात ज्या ठिकाणी शैक्षणिक पाया रचला जातोय तेथे या महामानवाची ओळख आणखी अधोरेखित होऊन जाते.
प्रत्येकाला श्रम करणे शक्य आहे. श्रम आहेत, पण पैसा नाही परिणामी शिक्षण नाही, अशी ग्रामीण भागाची शोकांतिका होती. श्रमिकांच्या मनगटातील ताकदीलाच भाऊरावांनी पैसा मानला. विविध क्षेत्रातील क्रांतीकारकांची परंपराच महाराष्ट्राला लाभली आहे. त्यामुळे हे राज्य प्रगत झाले. इथले लोक प्रगत झाले. अशा थोर समाज क्रांतीकारकांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल.
पैसा, सत्ता यापैकी जवळ काहीही नसताना कर्मवीरांनी शैक्षणिक क्रांती घडवून आणली. खरे म्हणजे ती सामाजिक क्रांतीच होती.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बहुजन समाजाला शिक्षित नव्हे; तर सुशिक्षित व संस्कारित करण्याचे व्रत कर्मवीरअण्णांनी स्वीकारले होते.
शिक्षणाशिवाय समाज- विशेषत: बहुजन समाज -प्रगत होऊ शकत नाही. त्याची दास्यत्वाची बंधने दूर होणार नाहीत हे त्यांनी ओळखले होते. केवळ भाषणे देऊन किंवा तत्त्वज्ञान सांगून शैक्षणिक प्रगती होणार नाही. तिथे कर्मयोगच आवश्यक आहे हे लक्षात घेवून त्यांनी खेडोपाडी शाळा सुरू केल्या.
त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देतानाच त्याला श्रमाची जोड दिली. श्रमाला प्रतिष्ठा दिली. त्यामुळे गोरगरिबांची मुले-मुली सन्मानाने व स्वाभिमानाने शिकू लागली.
रयत शिक्षण संस्थेत जी मुले शिकत होती, त्यांना शिक्षणाबरोबरच त्यांनी श्रमाचे आणि प्रामाणिकपणाचेही महत्त्व पटवून दिले. त्यामुळे त्यांच्या शिकवणीतून हजारो निष्ठावंत कार्यकर्ते तयार झाले. कर्मयोगाबरोबर श्रम योगही महाराष्ट्रात प्रतिष्ठित झाला.
कर्मवीरांनी सुरू केलेली शैक्षणिक उत्क्रांती केवळ एका शिक्षण संस्थेपुरती किंवा केवळ महाराष्ट्रापुरतीही मर्यादित राहिली नाही. ती आता सर्वदूर पसरली आहे.
आजमितीस शिक्षण क्षेत्राचा पसारा प्रचंड वाढला आहे. किंबहुना या क्षेत्राएवढे व्यापक क्षेत्र अन्य कोणतेही नाही. त्या शिक्षण विस्ताराचा पाया खर्या अर्थाने कर्मवीरअण्णांनी घातला आहे.
कर्मवीरअण्णांनी जी शिकवण दिली तिचे थोडे तरी स्मरण रोज ठेवणे किंवा त्यांच्या शिकवणीनुसार थोडे जरी काम केले तरी ही शैक्षणिक उत्क्रांती योग्य दिशेने वाटचाल करेल हे निश्चित.
– सुनील पाटील (ऐतवडे बुद्रूक)
हेही वाचलंत का?