पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. बहुजनांच्या शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या या महान शिक्षणतज्ज्ञाने मांडलेली भूमिका आजही दिशादर्शक आहे. त्यांनी वेळोवेळी मांडलेल्या या भूमिका….
शाहू बोर्डिंग हाऊस नावारुपास आणण्यासाठी माझ्या दिवगंत पत्नीने अत्यंत कष्ट केले आहेत. इतकेच नव्हे तर स्वत:च मंगळसूत्रही तिने या कामी खर्च केले आहे. मी सर्वांची ऋणे फेडीत आले .परंतु, माझ्या पत्नीचे ऋण मला आजतागायत फेडता आले नाही.
कर्मवीर शिंदे होऊन गेले, कितीही भाऊराव पाटील झाले किंवा इतर कितीही अस्पृश्यांचा उद्धार करणारे लोक जन्माला आले तरी अस्पृश्यांनी स्वत:चा उद्धार स्वत:च केला पाहिजे. अस्पृश्यांनी स्वत:च्या पायावर स्वत: उभे राहिले पाहिजे. तरच त्यांचा उद्धार होईल.
बहुजन समाजात शिक्षणाचा फैलाव करून आणि सामाजिक भेदभाव व अन्याय निवारून, जनतेला सुखाचा संदेश देणे हे माझे आवडते ध्येय आहे.
आपला उद्धार आपणच केला पाहिजे. आपण निराश न होता स्वत:च्या पायावर उभे राहीलाे लागलो तर प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा आपले वाईट करू शकणार नाही. दे दान सुटे गिराण या भिक्षांदेही पद्धतीचा आपण त्याग करुया.
अधिक धान्य उत्पादनासाठी आम्ही वर्षातून दोन महिने शाळा बंद ठेवू. दोन महिन्यांत सर्व विद्यार्थी शेतावर काम करतील. आमच्या संस्थांतील मुली त्यांना जेवायला घालतील. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हिमतीवर शिक्षण घ्यावे.
आपल्या देशातील गरीब कुटुंबे प्रतिकूल परिस्थितीमुळे आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत, ही गोष्ट मला मुळीच पसंद नाही. जे लोक शिकलेले आहेत त्यांनाच शिक्षणाचा लाभ मिळावा हे योग्य नाही. बहुजन समाजातील लोक इतके जंगली आहेत का, की त्यांना शिक्षण घेता येऊ नये?, जीवन नव्या रीतीने व्यतीत करता येऊ नये? त्यांच्यातही अनेक जण बद्धिमान आहेत, त्यांना जर शिक्षण दिले तर तेही मोठमोठी पदे स्वीकारून देशाची सेवा करू शकतील.
मोफत शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेचे ध्येय आहे. यासाठी संस्थेला दरवर्षी तीन लाख रुपयांची तूट येते. ही तूट आपण कशी भरून काढतो? खेडेगावांमधील लोक मदत करतात. श्री यादव नावाचे आमचे विद्यार्थी-शिक्षक सध्या खेडेगावांमध्ये जाऊन पोवाडे म्हणतात. त्या पोवाड्यांमधून लोकांना रयत शिक्षण संस्थेचे कार्य कळून येते आणि मग ते संस्थेला देणगी द्यायला तयार होतात.
शिवाजी महाराज मुसलमान द्वेष्टे नव्हते . महाराष्ट्रात सर्वात मोठा दुर्गुण कोणता असेल तर आपसांतील कलह हा होय. शिवाजी महाराजांना प्रथम कुणाशी लढावे लागले असेल तर ते आपल्या लोकांशी. चंद्रराव मोरे याचा काटा म्हणूनच शिवाजी महाराजांनी काढला. तद्वतच आपल्या कार्याच्या आड येणारे काटे काढून टाकले पाहिजेत.
आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी माझी पहिली घोषणा अशी की, मी आजपासून रेशनचे धान्य खाणार नाही. स्वत: कष्ट करून धान्य पैदा करावयाचे व ते खावयाचे यासाठी मी देवापूर
(ता. माण) येथे जाऊन राहणार आहे.
ज्या महाराष्ट्राने तीनशे वर्षांपूर्वी जाती, धर्म, पंथ, भेद विसरून शिवछत्रपतींच्या राष्ट्रीय वैभवाचा कळस गाठला, त्याच महाराष्ट्राला आज अत्यंत हीन अवस्था आली आहे. या वेळी ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित हे सर्व भेद भूतकाळात गांडून टाकून आणि ज्ञानदेव तुकाराम आणि शिवाजी- टिळक यांच्यासारख्या आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वाधीन केलेली आदर्श राष्ट्रीय जीवनाची संपत्ती संरक्षून आणि वाढवून पुन्हा एकदा कुणावर आक्रमक राज्य करण्यासांठी नव्हे तर आजच्या गोंधळाच्या परिस्थितीत नेतृत्वाचा आदर्श प्रस्थापित कऱ्यासाठी तुम्ही आम्हीच गमावलेले हे महाराष्ट्रीयत्व प्राप्त करून घेतले पाहिजे.
हेही वाचलं का? :