सांगली : दुचाकीवरून जाणार्‍या युवकावर बिबट्याचा हल्ला | पुढारी

सांगली : दुचाकीवरून जाणार्‍या युवकावर बिबट्याचा हल्ला

नेर्ले;  पुढारी वृत्तसेवा :  दुचाकीवरून निघालेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार बहेपूल ते तांबवे दंडभाग (ता. वाळवा) रस्त्यावर शनिवारी सायंकाळी घडला. बिबट्याने हल्ल्यानंतर दुचाकीचा पाठलाग केला. गेल्या काही महिन्यांपूर्वी नेर्ले – कापूसखेड रस्त्यावर असा प्रकार घडला होता.

शनिवारी तांबवे येथील रोहित जाधव हा दुचाकीवरून कामानिमित्त बहे येथे गेला होता. त्यानंतर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बहे- तांबवेच्या दंडभाग रस्त्यावरून घरी जात होता. त्यावेळी रस्त्याशेजारी असणार्‍या चरी पलीकडील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झेप मारली. बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्याने रोहित घाबरला. त्याने दुचाकीचा वेग वाढवला. 60 ते 70 मीटरपर्यंत बिबट्याने दुचाकीचा पाठलाग केला. यावेळी रोहित वेगाने गेल्याने बचावला.

गेल्या काही दिवसांपासून दंडभाग परिसरात बिबट्याचा वावर आहे. नेर्ले, पेठ, काळमवाडी, हुबलवाडी, कापूसखेड , तांबवे शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे शिवारात नेमके किती बिबटे आहेत याबद्दल वनविभागाही अनभिज्ञ आहे.

Back to top button