सांगली : दुधाची खरेदी 41 रुपयांनी तर विक्री 64 रुपयांस! उत्पादक-ग्राहकांची लूट | पुढारी

सांगली : दुधाची खरेदी 41 रुपयांनी तर विक्री 64 रुपयांस! उत्पादक-ग्राहकांची लूट

सांगली; विवेक दाभोळे : एखादा सन्माननीय अपवाद सोडला तर जिल्ह्यात दूध संकलन केंद्र, सहकारी दूध संस्थांतून प्रतिलिटर दुधाची खरेदी 40 ते 41 रुपयांनी होत आहे. विक्री मात्र तब्बल 61 पासून 64 रुपयांनी होत आहे. विशेष म्हणजे या दराने खरेदी करण्यात येणारे दूध सहा-साडेसहा फॅटचे असते. मात्र, जवळपास 61 ते 64 रु. इतका दर देऊन देखील ग्राहकांना दूध नावाचे जणू पांढरे पाणीच घ्यावे लागत आहे. खरेदी फॅटच्या सूत्रानुसार या दुधाची फॅट किमान 9 असली पाहिजे. प्रत्यक्षात ती 6 फॅटच्या घरात राहते. जिल्ह्यातील प्रतिदिन दुधाचे संकलन 14 लाख 40 हजार लिटरच्या घरात होते. यावरून दररोज ‘पांढर्‍या बोक्यां’ च्या खिशात किती रुपयांची मलई विनासायास जात असेल याची कल्पनाच केली तरी ते पुरेसे ठरावे..!

उभ्या आडव्या मराठी मुलुखाचे ग्रामीण अर्थकारण हे दूधव्यवसायावर अवलंबून राहते. ग्रामीण भागात दूध संकलन केंद्रामध्ये सकाळी व संध्याकाळी दुधाचे संकलन होते. येथे ग्राहकांना जे दूध थेट विक्री केले जाते, ते दूध 6 फॅटच्या रेंजमध्ये असते, किंबहुना ते सहा फॅटच्या आतीलच असेल याची पुरेपूर दक्षता घेतली जाते. तर संकलित होणारे 6 पेक्षा अधिक फॅट असलेले पुढे संघाकडे दिले जाते. फॅटमध्ये ‘हातमारी’ दूध संकलन केंद्रांमध्ये साधारणपणे 6 फॅटचे दूध 41 रुपये 30 पैशांनी विकत घेतले जाते. अवघ्या काहीच वेळात हेच दूध थेट विक्री करताना 61 पासून 64 रुपये प्रतिलिटरने ग्राहकाला विकले जाते. अवघ्या काही मिनिटांच्या आतच ही खरेदी – विक्री होते. मात्र, मधल्या काही वेळातच या दुधाची फॅट किमान पातळीवर कशी येईल याची कमालीची दक्षता घेतली जाते. किंबहुना ती कमी आणलीच जाते. दरम्यान, कमी फॅटचे दूध थेट विक्री होते. त्यात तब्बल 20 ते 24 रुपये प्रतिलिटर तर मिळतातच! यानंतर संकलन केंद्रांकडील राहिलेल्या दुधाची सरासरी फॅट 6 पेक्षा जास्त असते. त्यामुळे त्यांना मोठ्या दूध संस्थेकडून अधिक दर मिळतो. तर मोठी दूध संस्था अथवा संघ आपल्याकडे अशा गावागावांतून आलेल्या शेलक्या दुधातून मलई काढतात. दही, लोणी, पेढे, बासुंदी, पनीर, खवा, श्रीखंड, आम्रखंड, चॉकलेट, मसाला दूध, ताक बनवितात. उरलेले सरासरी 6 किंवा त्यापेक्षाही कमी फॅटचे दूध शहरी ग्राहकांना पिशवीतून सरासरी 64 रुपये प्रतिलिटर विकले जाते. काही ठिकाणी हाच दर 62 ते 64 रुपये देखील आहे. दुसरीकडे सर्वसाधारण प्रजातीच्या एका म्हशीची किंमत 80 हजार ते 1 लाखांच्या घरात आहे. तिच्या देखभालीचा रोजचा खर्च सरासरी 400 रुपये येतो. हिरव्या – ओल्या चार्‍यासाठी जमिनीतील एखादा तुकडा पिकाऐवजी वैरणीसाठी राखीव ठेवावा लागतो. इतके करुनही म्हशीचा दुधाचा काळ सरासरी दरदिनी 5-6 लिटरप्रमाणे 6 महिने जरी चालला, तर त्या शेतकर्‍यास घरच्या दुधाचा खर्च भागून कसेबसे 32 हजारांच्या आसपास पैसे मिळतात.

मात्र, दुसरीकडे दूध संकलन केंद्र एका सर्वसाधारण दूधउत्पादक शेतकर्‍याकडून 32 हजार रुपयांचे दूध घेऊन 64 हजार करतो. खरे तर इतका मोठा नफा अन्य दुसर्‍या कोणत्याही धंद्यात मिळत नसावा. या खुलेआम होत असलेल्या लुटीबद्दल दूधउत्पादकांतून जळजळीत शब्दात प्रतिक्रिया उमटत आहेत.

Back to top button