सांगली : एसटी प्रवाशांना लुटणार्‍या महिलांची टोळी जेरबंद | पुढारी

सांगली : एसटी प्रवाशांना लुटणार्‍या महिलांची टोळी जेरबंद

  नेर्ले; पुढारी वृत्तसेवा :  एसटी बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना लुटणारी महिलांची टोळी कासेगाव पोलिसांनी शनिवारी जेरबंद केली. औरंगाबाद येथील सहा महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 44 हजार 395 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. साहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश मते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अलबेली शिवा बुडबुड (वय20), नर्सव्वा अशोक ऊर्फ राजू बुडबुड (35), सरस्वती वसंत बुडबुड (22), रायश्वेरी सचिन बुडबुड (25), ज्योती सुरेश बुडबुड (25), अंजली प्रदीप बुडबुड (25, सर्व रा. औरंगाबाद, चिखलठाणा, जालना रोड) अशी अटक केलेल्या संशयित महिलांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कवठेमहांकाळ येथील सुनीता तात्यासाहेब पाटील या पुणे ते सांगली या बसने प्रवास करीत होत्या. संशयित महिला या कराड येथे बसमध्ये चढल्या. बस कासेगाव येथे आल्यावर फिर्यादी सुनिता पाटील यांची पर्स मिळून आली नाही. त्यांनी आरडाओरडा केला. तोपर्यंत बस नेर्ले बसस्थानकावर आली. संशयित महिला घाईने बसमधून उतरल्या. फिर्यादी सुनिता पाटील याही उतरल्या. तोपर्यंत या महिला निघून गेल्या होत्या. सुनिता यांनी थेट कासेगाव पोलिस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला.

सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते यांनी नेर्ले परिसरात गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना केले. तेव्हा त्या महिला कराडच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. महिला पोलिसांच्या मदतीने या संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पांढर्‍या रंगाची पर्स व त्यामध्ये रोख 5 हजार रूपये, 55 हजारांचा एक लक्ष्मीहार, 46 हजार 665 रुपयांचा एक नेकलेस, 36 हजार 414 रुपयांचे गंठण, 856 रूपयांची अंगठी असा एकूण 1 लाख 44 हजार 395 रुपयांचा माल मिळून आला. हा मुद्देमाल चोरीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपास पोलिस नाईक शिवाजी यादव करीत आहेत.

Back to top button