मदन पाटील यांच्या संदर्भातील दाव्याची सुनावणी पूर्ण | पुढारी

मदन पाटील यांच्या संदर्भातील दाव्याची सुनावणी पूर्ण

सांगली : पुढारी वृत्तसेवा  वसंतदादा बँकेतील 375 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीतून वगळावे, या मागणीसाठी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सुरू असलेल्या तीन दाव्यांपैकी (स्व.) मदन पाटील यांच्या संदर्भातील दाव्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. तो दावा निकालासाठी ठेवण्यात आला असून उर्वरित दोन दाव्यांची सुनावणी तहकूब ठेवण्यात आली आहे.

विनातारण कर्ज, कमी तारणावर जादा कर्ज व थकबाकीदारांना पुन्हा कर्ज देऊन बँकेचे सुमारे 375 कोटीचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका तत्कालीन वैधानिक लेखापरीक्षक आर. एन. शिर्के यांनी ठेवला होता. त्यांच्या अहवालानुसार सहकार आयुक्‍तांनी या गैरव्यवहाराची सहकार कायदा कलम 88 अन्वये चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या अ‍ॅड. आर. डी. रैनाक या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

अ‍ॅड. रैनाक यांनी नियम 72 (1) नुसार तत्कालीन संचालक, कर्ज विभागाचे अधिकारी व शाखाधिकारी यांना कारणे नोटीसा पाठवल्या होत्या. त्यांच्याकडून 72(2) नुसार खुलासा घेण्यात आला. त्यानंतर 72 (3) नुसार 31 जणावर आरोपपत्र ठेवण्यात आले.

संशयित 31 जणांच्या 101 मिळकतींवर चौकशी अधिकारी यांनी 95 (4) नुसार दावा पूर्व जप्‍ती बोजा चढविला आहे. चौकशी अधिकार्‍यांच्या या आदेशाविरूद्ध पुणे येथील अपिलन्ट कोर्टामध्ये दाद मागितली आहे. अपिलन्ट कोर्टाने स्व. मदन पाटील व त्यांच्या वरसदारांच्या नावे असलेल्या मिळकती वगळून अन्य सर्व मिळकतीवरील जप्‍ती बोजा रद्द केला आहे.

दरम्यान, चौकशीतूनच म्हणजे आरोपपत्रातून आपली नावे वगळावीत यासाठी (स्व.) मदन पाटील यांचे तीन वारसदार तसेच बँकेचे तत्कालीन अधिकारी विजय विरूपाक्ष घेवारे, प्रकाश बाबूराव साठे यांनी सहकारमंत्री यांच्याकडे अपील दाखल केले आहे.

या अपिलाची सुनावणी मुंबई येथील साखरभवन मध्ये झाली. मदन पाटील यांच्या वारसदारांच्या मदतीने अ‍ॅड. लुईस शहा आणि प्रकाश साठे यांच्यावतीने अ‍ॅड. सुनील नानवाणी यांनी काम पाहिले. दरम्यान, या दाव्यामध्ये पक्षकार करून घ्यावे, अशी मागणी करणारा अर्ज शिवाजी हिंदुराव पाटील यांनी सहकारमंत्र्यांकडे सुनावणी दरम्यान केला आहे.

Back to top button