सांगली : तासगावात हिसडा गँगचा धुमाकूळ | पुढारी

सांगली : तासगावात हिसडा गँगचा धुमाकूळ

तासागाव; पुढारी वृत्तसेवा :  शहराच्या वेगवेगळ्या भागात शनिवारी हिसडा गँगने धुमाकूळ घातला. तिघा जणांच्या गळ्यातील एक लाख 45 हजारांचे दागिने या गँगने लंपास केले. काही वेळातच शहराच्या वेगवेगळ्या भागात या घटना घडल्याने एकच खळबळ माजली होती.
याबाबत यश जयप्रकाश किर्दत (रा. आनंदनगर, कुपवाड), गजानन शंकर राऊत (रा. पुणदी रोड, तासगाव) व माणिक शंकर चव्हाण (रा. ज्योतिर्लिंगनगर, तासगाव) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांंविरोधात फिर्यादी दिली आहे.

यश किर्दत हे शहराच्या मुख्य रस्त्यावरील शनी मंदिर ते काशीपुरा रस्त्यावरून स्टेट बँकेकडे जात असताना अज्ञात चोरट्याने पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीची 15 ग्रॅम वजनाची चेन हिसडा मारून लंपास करण्यात आली. यावेळी यश यांनी आरडाओरड केली परंतु चोरटे पसार झाले.

तसेच गजानन राऊत हे सोमवार पेठेतील रस्त्यावरून जात असताना येथील एका संगणक केंद्रासमोर पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्याने राऊत यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची 40 हजार रुपये किंमतीची गळ्यातील चेन हिसडा मारुन लंपास केली.
माणिक चव्हाण हे गणपती मंदिर ते गुरुवार पेठेकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्याने माणिक यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किंमतीची 7 ग्रॅम वजनाची चेन हिसडा मारून लंपास केली.

शहरात खळबळ

तिन्ही घटना शहरातील गजबलेल्या आणि मुख्य रस्त्यावर घडल्याने शहरात खळबळ माजली आहे. गणपती मंदिर ते शनी मंदिर रस्त्यावर वाहतूक पोलिसांचा अपवाद वगळता दिवसभर राबता असतो. तरीही या घटना घडल्याने चोरट्यांनी पोलिसांच्या समोर आव्हान उभे केले आहे.

Back to top button