मिरज : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने खुनी हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा | पुढारी

मिरज : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने खुनी हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा

मिरज : पुढारी वृत्तसेवा रिक्षा घेण्यासाठी उसने दिलेले 70 हजार रुपये परत मागितल्याने रागाच्या भरात एकावर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये विजय साठे हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी त्यांची पत्नी व्हॅलरी विजय साठे यांनी गौतम रामचंद्र साठे (वय 40, रा. हनुमान नगर, सावळी रस्ता, मिरज) याच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय साठे यांनी गौतम साठे याला रिक्षा खरेदी करण्यासाठी 70 हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे विजय यांनी गौतम याच्याकडून परत मागितले होते. परंतु ते पैसे देण्यास गौतम टाळाटाळ करीत होता. पैसे देण्यासाठी विजय यांनी तगादा लावल्यानंतर गौतम याने रागाच्या भरात कोयत्याने खुनी हल्ला केला.

या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी गौतम याला अटक केली आहे. तर जखमी विजय यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

Back to top button