सांगली जिल्ह्यामध्ये सतराशे क्षय रुग्ण | पुढारी

सांगली जिल्ह्यामध्ये सतराशे क्षय रुग्ण

सांगली; पुढारी वृत्तेसवा : जिल्ह्यात 20 हजार 427 संशयित क्षय रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 हजार 760 रुग्ण क्षयरोगाचे आढळून आले आहेत. यामध्ये 1,043 पुरुष आणि 849 स्त्री आहेत. क्षयरुग्ण तपासणीच्या मोहिमेत राज्याच्या सरासरीच्या तुलनेत सांगली जिल्ह्याचे काम 2 टक्के जास्त आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली. तसेच प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य सामुग्रीसाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी तसेच जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, सर्व वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य अधिकारी डॉ. माने म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागातून जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्ण शोधा. कर्मचारी आणि आशांना यासाठी उद्दिष्ट द्या.

मिरजेतील वॉर्ड पुन्हा कार्यान्वित

ते म्हणाले, क्षयरुग्ण निदानानंतर केल्या जाणार्‍या तपासण्या वेळेत करून घ्याव्यात. क्षयरुग्णाचा सानिध्यात असणार्‍या सर्वांची संशयित म्हणून बेडका नमुना तपासणी, क्ष-किरण तपासणी करून घ्यावी. रुग्णांना औषधोपचार देण्यासाठी आशा आणि घरातील व्यक्तीचाही सहभाग वाढवा. तसेच औषध उपचारांना दाद न देणार्‍या क्षयरुग्णाच्या उपचारासाठी मिरजेतील शायकीय वैद्यकीय महाविद्यालयात असणारा वॉर्ड पुन्हा कार्यान्वित करा.

डॉ. माने म्हणाले, क्षयरुग्णांना लागणारी मदत, कोरडा शिधा, स्किल डेव्हलपिंगसाठी प्रशिक्षण, क्षय रुग्णांना त्यांच्या व्यावसायिक ज्ञानानुसार नोकरी मिळवून देण्यासाठी सामाजिक साहाय्यता घ्या. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना या उपक्रमातील सहभाग वाढवण्यासाठी त्यांचे नियमित प्रशिक्षण घ्या.

Back to top button