सांगली : स्वाईन फ्ल्यू नियंत्रणासाठी 88 पथके | पुढारी

सांगली : स्वाईन फ्ल्यू नियंत्रणासाठी 88 पथके

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे सात रुग्ण सापडले आहेत. यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्वाईन फ्ल्यूवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर 5, तालुका पातळीवर 10, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 64 आणि मनपा क्षेत्रात 9 अशा एकूण 88 पथकांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.

तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, सीएचओ तसेच जिल्हा स्तरावरील पर्यवेक्षकांची बुधवारी ऑनलाईन बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

आरोग्य अधिकारी डॉ. माने म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे स्क्रिनिंग सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत. स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच सर्वेक्षणात आढळून येणार्‍या रुग्णाच्या वर्गवारीप्रमाणे स्क्रिनिंग करून उपचार करण्यात येत आहेत.

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

ते म्हणाले, सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांवर प्रभावी उपचार करता यावा, याकरिता प्रतिबंधक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवला आहे.

खासगी डॉक्टरांसाठी कार्यशाळा

डॉ. माने म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर त्यांच्या कार्यक्षेत्रात असणार्‍या खासगी वैद्यकीय सेवा देणार्‍या व्यावसायिकांची स्वाईन फ्ल्यूबाबत कार्यशाळा घेण्यात येत आहेत. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांची कार्यशाळा घेण्यात आलेली आहे. आवश्यकता भासल्यास 102 व 108 रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्याची सूचना दिली आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळा,

महाविद्यालये, आश्रमशाळा या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये आजाराविषयी प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच स्वाईन फ्ल्यू सदृश्य रुग्ण आढळ्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे, आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी केले.

मिरजेत स्वॅब तपासणी

डॉ. माने म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय मिरज येथील प्रयोगशाळेत संशयित रुग्णाच्या स्वॅब तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Back to top button