सांगलीत घर फोडले; सोन्याचे दागिने लंपास | पुढारी

सांगलीत घर फोडले; सोन्याचे दागिने लंपास

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील जुना कुपवाड रस्त्यावरील रुपाली सिद्धू कांबळे (वय 39) यांचे घर फोडून चोरट्यांनी 48 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कांबळे समर्थ कॉलनीत फ्लॅट क्रमांक पाचमध्ये राहतात. मंगळवारी दुपारी दोन वाजता त्या कुटुंबासह कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. या काळात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटून टाकले. लॉकरमधील 48 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

दुपारी तीन वाजता कांबळे कुटुंब घरी आले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. स्थानिक गुन्हेगारांनी पाळत ठेऊन चोरी केल्याचा संशय आहे. कांबळे कुटुंब केवळ एकच तास घरात नव्हते. तेंव्हा ही चोरी झाली आहे. कदाचित चोरटे याच परिसरातील असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी समर्थ कॉलनी, तसेच विश्रामबाग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू ठेवला आहे.

Back to top button