‘अलमट्टी’ने शब्द पाळला, सांगली, कोल्हापूरचा महापूर टळला! | पुढारी

‘अलमट्टी’ने शब्द पाळला, सांगली, कोल्हापूरचा महापूर टळला!

सांगली : सुनील कदम; सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील महापुराला कर्नाटकचे अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरच कारणीभूत ठरते, हे आजपर्यंत अनेकवेळा सिद्ध झाले आहे; पण कर्नाटक शासन ते मान्य करीत नव्हते. मात्र, 2019 च्या महापुरानंतर एकदाची ही बाब कर्नाटकच्या गळी उतरली आणि दोन राज्यांची एकत्रित धरण परिचालन योजना कार्यान्वित झाली. त्याचाच परिणाम म्हणून यंदा नियोजनानुसार अलमट्टीतून पाणी सोडल्याने या भागातील महापुराचा धोका टाळला गेला.

अलमट्टीचे बॅकवॉटर आणि पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या परस्परसंबंधाबाबत तज्ज्ञांमध्ये मत-मतांतरे आहेत. नेमका याचाच फायदा घेऊन कर्नाटक शासन इथल्या महापुराचा आणि अलमट्टीचा काही संबंध नाही, अशी भूमिका घेत आले हातेे. मात्र, 2019 च्या महापुरावेळी तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेऊन अलमट्टी आणि महापूर यांचा परस्परसंबंध त्यांना पटवून दिला होता. त्यानुसार अलमट्टीतून विसर्ग करण्याचे कर्नाटकने मान्य केले होते. यंदा पावसाला खर्‍या अर्थाने 10 जुलैपासून सुरुवात झाली; मात्र त्यापूर्वीच 2 जूनपासून धरणातील पाण्याची आवक विचारात घेऊन अलमट्टीतून काही प्रमाणात विसर्ग चालू करण्यात आला होता.

11 जुलैपासून सलग आठ दिवस महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू होती. ही बाब विचारात घेऊन 13 ते 18 जुलै या कालावधीत अलमट्टीतून 1 ते 1.50 लाख क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होताच त्या प्रमाणात अलमट्टीतून विसर्ग कमी करण्यात आला. त्यानंतर 8 ते 20 ऑगस्ट यादरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी सुरू झाली. राधानगरी, चांदोली, कोयनासह अन्य धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू झाला. परिणामी, याच कालावधीत अलमट्टीतूनही 1 ते 2.50 लाख क्यूसेकने विसर्ग सुरू होता. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेसह बहुतेक सगळ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, सांगलीतही कृष्णा-वारणा धोक्याच्या पातळीकडे सरकू लागल्या होत्या.

अनेक ठिकाणी महापुराची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसून येत होती; पण या काळात अलमट्टीतून तब्बल अडीच लाख क्यूसेकने विसर्ग सुरू राहिल्यामुळे कोल्हापूरचा महापूर हाताबाहेर गेला नाही. सध्याही अलमट्टीतून आवक विचारात घेऊन 50 हजार क्यूसेकपेक्षा जादा विसर्ग सुरू आहे. एकूणच काय, तर महाराष्ट्र आणि कर्नाटक जलसंपदा विभागाच्या योग्य समन्वयामुळे आणि प्रामुख्याने अलमट्टीतून वेळच्या वेळी योग्य प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे इथला महापुराचा धोका टळला गेला. अलमट्टी धरणाचे बॅकवॉटर आणि या भागातील महापुराबाबत तज्ज्ञांमध्ये जरी काही मत-मतांतरे असली, तरी अलमट्टीतून पाणी सोडले की, इथला महापूर ओसरतो, ही बाब यंदा अधिक प्रकर्षाने स्पष्ट झाली आहे. त्यामुळे भविष्यातही महाराष्ट्र आणि कर्नाटकने पावसाळ्यादरम्यान याच पद्धतीने नियोजन करून महापूर टाळण्याची गरज आहे.

महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस, धरणांमधील पाणीसाठा, संभाव्य विसर्ग याचा रोजच्या रोज आढावा घेतला जात होता. त्यानंतर कर्नाटक जलसंपदा विभागाशी बोलून अलमट्टीतील विसर्ग आम्ही निश्चित करीत होतो. त्यामुळे पूरस्थिती उद्भवली नाही.
– मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, जलसंपदा
विभाग, सांगली

मी अलमट्टी धरणावरच मुक्कामी होतो. रोजच्या रोज अलमट्टी धरणात होत असलेली पाण्याची आवक, पाणी पातळी, एकूण साठा याची सविस्तर माहिती सांगली जलसंपदा विभागाला कळवीत होतो. त्यानुसार आमचे अधिकारी कर्नाटकच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून विसर्ग निश्चित करीत होते.
– श्रीपाद मलगण, समन्वयक, जलसंपदा विभाग, सांगली

Back to top button