महाराष्ट्राच्या राजकारणात डबलबारी! कोणी कोणाला डिवचलं?

महाराष्ट्राच्या राजकारणात डबलबारी! कोणी कोणाला डिवचलं?
Published on
Updated on

कोकणात डबलबारी या पारंपरिक प्रकारात दोन भजनीबुवा आपापल्या भजनांमधून सवाल-जबाब करतात. अत्यंत मनोरंजक असा हा प्रकार असतो. असाच एक डबलबारी भजनाचा वेगळा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात या 'डबलबारी' भजनासारखेच सवाल-जबाब सुरू आहेत. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काढलेल्या उद‍्गारापासून या डबलबारीची सुरुवात झाली आणि त्यानंतर शिवसेना आणि राणे यांच्यात सामनाच रंगला. राणे यांना अटक करून कोर्टात नेल्यानंतर दोन दिवस मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरात रस्त्यांवर राडा सुरू होता. शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयांवर हल्ले केले, दगडफेक झाली. राणे समर्थक आणि शिवसेना नेत्यांनी एकमेकांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. नारायण राणे सध्या ज्या पक्षात आहेत, त्या भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांना याची सवय नव्हती. शिवसेनेशी पंचवीस वर्षांची मैत्री तुटल्यानंतरही शिवसैनिकांकडून भाजप कार्यालयांवर हल्ले झाले नव्हते. त्यामुळे आताचे प्रकार पाहून भाजपचे जुने कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवकदेखील हबकून गेले. मात्र, राज्यातल्या बदलत्या राजकारणाची ही सुरुवात आगामी काळात काय होणार याची चुणूक दाखवणारी आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या ज्या वेळी आरोप झाले, त्या त्या वेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने त्याचा आपल्या पद्धतीने प्रतिकार करत. यावेळी उद्धव ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवरची टीका होऊनही शिवसेनेचे जुने आणि जाणते नेते गप्प आहेत. परवाही मुंबईत रस्त्यावर उतरले ते शाखाप्रमुख वा नगरसेवक नव्हे, तर युवा सेनेचे कार्यकर्ते! आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी मोठाच खटाटोप केला गेला होता, असे म्हणतात. वरुण सरदेसाई यांचे नेतृत्व सामान्य शिवसैनिक आणि नेत्यांना मान्य नाही. ठाकरे असतील तर आम्ही एकवेळ नेते मानू, मात्र उद्या त्यांचे आते-मामे-मावस भाऊ आणि मेव्हण्या-पावण्यांच्या हातात जर संघटना दिली जाणार असेल, तर आम्ही कशाला काम करायचे असा सामान्य शिवसैनिकांचा सवाल आहे.

एक सदस्यीय प्रभाग पद्धत

फेब्रुवारीत राज्यातल्या अनेक महापालिकांची मुदत संपत आहे. चारच महिन्यांत 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 27 ऑगस्टपासून या 18 महापालिकांत एकसदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जाईल. भाजपची सत्ता असताना बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा शिवसेना-भाजपला फायदा झाला होता. महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये एकसदस्यीय प्रभाग रचनेला मंजुरी दिली. त्यानुसार निवडणूक आयोगाने सूचना जारी केली.

एकसदस्यीय प्रभागरचनेमुळे वॉर्डातल्या धनदांडग्या आणि गुंडपुंडांचे फावेल आणि अपक्षांना फायदा होईल, असे म्हणतात. मात्र, या पद्धतीमुळे वॉर्डातील मतदारांशी संपर्क साधणे सोपे जाणार असून, लोकांना माहीत असलेल्या उमेदवाराला पसंती मिळू शकते. त्याचा मनसेसारख्या थेट जनसंपर्क असलेल्या पक्षाला फायदा होऊ शकतो. पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पैकी मुंबई वगळता अन्य सर्वच ठिकाणी बहुसदस्यीय प्रभाग समिती होती.

आता मात्र प्रत्येक वॉर्डात तिरंगी, चौरंगी लढती होणार असल्याने 'ज्याच्या हाती ससा तो पारधी बनेल,' हे नक्‍की! मुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याचे दिसते. मात्र, तिसर्‍या लाटेचे संकट येईल अशी खात्रीच अनेक संस्था व्यक्‍त करत आहेत. सणवार, उत्सव आणि सामान्यांसाठी लोकलप्रवास यातून कोरोना पुन्हा डोके वर काढेल अशी शक्यता आहे. त्यामुळे अजूनही संकट टळलेले नाही, हे लक्षात घेऊन राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांनी जनतेला वेठीस धरू नये!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news