सातारा : कोयनेचे दरवाजे 3 फुटांवर स्थिर | पुढारी

सातारा : कोयनेचे दरवाजे 3 फुटांवर स्थिर

पाटण; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणात सध्याचा उपलब्ध पाणीसाठा, पाणी सामावून घेण्याची संपुष्टात येत असलेली साठवण क्षमता व हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज लक्षात घेता कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे तीन फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मंगळवारी धरणात एकूण 96.32 टीएमसी पाणीसाठा नोंदला गेला आहे.

धरणाच्या दरवाजातून विनावापर 19,181 व धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2,100 असे एकूण पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 21,281 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे कोयना नदी पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

105.25 टी.एम.सी. पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पाणी सामावून घेण्याची क्षमता, आगामी काळातील पाऊस, सध्याची पाणी आवक व पूर्वेकडे कोयना व कृष्णा नदीपात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता व पूर्वेकडे संभाव्य महापूराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

सोमवार सायंकाळी पाच ते मंगळवारी सायंकाळी पाच या चोवीस तासांतील पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 39 मि.मी., नवजा 60 मि.मी. व महाबळेश्वर 80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणाची स्थिती एकूण पाणीसाठा 96.32 टी.एम. सी., उपयुक्त पाणीसाठा 91.32 टी. एम. सी., पाणीउंची 2156.7 फूट, जलपातळी 657.327 मीटर इतकी झाली आहे. 105.25 टी.एम.सी. पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे केवळ 8.93 टी.एम.सी .पाण्याची गरज आहे. 24 तासात धरणातील पाणीसाठ्यात 0.63 टीएमसी ने तर पाणीउंचीत सहा इंचाने वाढ झाली आहे.

Back to top button