सांगली : कैदी पलायनाचे गूढ वाढले | पुढारी

सांगली : कैदी पलायनाचे गूढ वाढले

सांगली : पुढारी वृत्तसेवा : येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सुनील ज्ञानू राठोड (वय 26, रा. यळगूड, ता. सिंदगी, जि. विजापूर) या कैद्याच्या पलायन नाट्याचे गूढ वाढले आहे. पाच दिवस होऊन गेले तरी त्याचा कुठेच सुगावा लागत नसल्याने पोलिस यंत्रणा हतबत झाली असल्याचे चित्र आहे.

तासगाव येथे जेसीबी चालकाच्या खूनप्रकरणी राठोड गेल्या वर्षभरापासून कारागृहात बंदी होता. रविवारी सकाळी त्याला कारागृह परिसरातील स्वच्छता करण्यासाठी बरॅकमधून बाहेर काढण्यात आले होते. कचरा टाकण्याचा बहाणा करून त्याने भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते. अवघ्या काही सेकंदात हा प्रकार घडल्याने सुरक्षारक्षकही चक्रावून गेले.

राठोडचा तातडीने शोध सुरू ठेवण्यात आला, पण त्याचा सुगावा लागला नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले. एसटी बस, रेल्वेची तपासणी केली, पण तो सापडला नाही. बाहेरील जिल्ह्यातील पोलिसांना त्याचे छायाचित्र पाठविण्यात आले. मात्र काही प्रतिसाद मिळालेला नाही. पोलिसांनी कर्नाटकात त्याच्या गावी जाऊन चौकशी केली. मात्र तो तिकडेही गेला नसल्याचे माहिती मिळाली.

राठोडला पळून जाऊन सहा दिवस होऊन गेले तरी तो सापडत नसल्याने पोलिस यंत्रणा हतबल झाली आहे. कदाचित तो बाहेरील राज्यात गेला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्याच्या सर्व नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. तो नातेवाईकांच्या संपर्कात आला तर कदाचित सापडू शकेल, असेही पोलिसांनी सांगितले.

Back to top button