मिरज : कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या | पुढारी

मिरज : कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

मिरज; पुढारी वृत्तसेवा : कर्जाला कंटाळून सोनी (ता. मिरज) येथील शेतकर्‍याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सदरची घटना मंगळवारी दुपारी मणेराजुरी येथील कोड्याच्या माळाजवळ उघडकीस आली. दीपक सुबराव सूर्यवंशी (वय 42) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, दीपक सूर्यवंशी यांची सोनी येथे अडीच एकर द्राक्षबाग आहे. शेतीसाठी त्यांनी बँकांकडून सुमारे दोन ते अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते. परंतु, वारंवार येणार्‍या नैसर्गिक संकंटामुळे त्यांचे शेतीमध्ये मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ते बँकांचे कर्ज फेडू शकले नव्हते.

कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून तगादा सुरू होता. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होते. सोमवारी ते तासगाव तालुक्यातील जाय गव्हाणला जावून येतो, असे सांगून घरातून निघून गेले. परंतु मंगळवारी दुपारपर्यंत ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान मंगळवारी दुपारी सूर्यवंशी हे मणेराजुरी येथील कोड्याच्या माळाजवळ मृतावस्थेत सापडले. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे.

Back to top button