सांगलीत 500 किलो प्लास्टिक जप्त | पुढारी

सांगलीत 500 किलो प्लास्टिक जप्त

सांगली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी महापालिका क्षेत्रात विविध मॉल, बेकरी, हॉटेल, कोल्ड्रिंक हाऊसची अचानक तपासणी केली. बंदी असलेले 500 किलो सिंगलयूज प्लास्टिक जप्त करण्यात आले. सहा दुकानांकडून 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महापालिका क्षेत्रात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लॅबोरेटरी हेड अनंता एन. एस., ज्युनियर असिस्टंट सूड, प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगलीचे क्षेत्रीय अधिकारी रोहिदास मातकर, महापालिकेचे पर्यावरण अभियंता अजित गुजराती, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी काही दुकानांना अचानक भेट देऊन तपासणी केली. सिंगलयूज प्लास्टिकचा वापर असणार्‍या वस्तूंची पाहणी केली.

डी मार्ट, एपे बेकरी, दुर्गा प्लस्टिक, मोना प्लास्टिक, आरती प्लास्टिक, संजय डिस्पोझलमधून विक्रीसाठी असणारे सिंगलयूज प्लास्टिक जप्त करण्यात आले. या कारवाईत स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, किशोर कांबळे, अंजली कुदळे, कोमल कुदळे, धनंजय कांबळे, गणेश माळी, वैभव कुदळे, नितीन कांबळे, राजू गोंधळे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.

आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 जुलैपासून सिंगलयूज प्लास्टिक वापर करणार्‍यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्लास्टिक विक्रेत्याकडून सिंगलयूज प्लास्टिकचा वापर, विक्री होऊ नये याबाबत कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

Back to top button