सांगली : कासेगाव येथील वृद्धाच्या खुनाचे गूढ कायम | पुढारी

सांगली : कासेगाव येथील वृद्धाच्या खुनाचे गूढ कायम

कासेगाव; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील मज्जीद अत्तार (60) या वृद्धाच्या खुनाचे गूढ कायम असून निर्जनस्थळी खून झाल्याने पोलिसांच्या हाती कसलेच धागेदोरे नाहीत. श्वान पथक मागवूनही तपासात अडथळे येत आहेत. त्यामुळे याबाबत माहिती देणार्‍यांसाठी योग्य ते बक्षीस देण्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. आज अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी भेट दिली.

मुळचे कासेगावचे असलेल्या व शेणे येथे आपल्या बहिणीकडे राहत असलेल्या अत्तार या वृद्धाचा अज्ञातांनी गुरुवारी रात्री कासेगाव-शेणे रस्त्यालगत असलेल्या राजारामबापू साखर कारखान्याच्या गट कार्यालया नजीक डोक्यात सिमेंट काँक्रीटचा दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. घटनास्थळ मनुष्यवस्तीपासून दूर व अंधार्‍या ठिकाणी असल्याने खुन्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान कासेगाव पोलिसासमोर उभे राहिले आहे.

पोलिस कासेगाव, शेणे या परिसरात कसून तपास करीत आहेत. विविध ठिकाणी चौकशी केली, श्वान पथकास पाचारण केले, मात्र चार दिवस उलटून गेले तरीही त्यांच्या हाती ठोस असे धागेदोरे लागलेले नाहीत. त्यामुळे खुनाबाबत माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेऊन त्यास रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षीस देण्याचे आवाहन कासेगाव ठाण्याकडून करण्यात आले आहे.

Back to top button