सांगली : इस्लामपुरातील खुनी हल्‍ला : तिघेजण ताब्यात | पुढारी

सांगली : इस्लामपुरातील खुनी हल्‍ला : तिघेजण ताब्यात

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार दिनकर शिंदे (वय 49) यांच्यावर लोखंडी गजाने खुनी हल्‍ला केल्याप्रकरणी तिघा संशयितांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनी हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचा तालुकाप्रमुख (शिंदे गट) सागर मलगुंडे याच्यासह त्याच्या सहा साथीदारांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिवकुमार हे सोमवारी सकाळी दूध घेवून मोटारसायकलवरून घरी निघाले होते. मंत्री कॉलनी ते हनुमाननगर रस्त्यादरम्यान संशयित मलगुुंडे व त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी शिवकुमार यांची मोटारसायकल अडविली. लोखंडी रॉडने त्यांच्या हातावर, पायावर, पाठीत मारहाण केली. या मारहाणीत शिवकुमार यांच्या पायाला, हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी मंगळवारी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांनी सांगितले.

Back to top button