जत : २५ हजाराची लाच घेताना पोलिस जाळ्यात | पुढारी

जत : २५ हजाराची लाच घेताना पोलिस जाळ्यात

जत शहर ; पुढारी वृत्तसेवा : दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजारांची लाच घेणार्‍या जत पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक संभाजी मारूती कारंडे (वय 38, रा. कोश्यारी, ता. जत) याला रंगेहाथ पकडण्यात आले. चाहूल लागताच लाचेची मागणी करणारा मुख्य संशयित गणेश ईश्वरा बागडी (रा. मिरज) या पोलिसाने पलायन केले. त्याच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली. या कारवाईनंतर पोलिस ठाण्यात सन्नाटा पसरला होता. रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत विभागाचे पथक जत पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते.

गेल्या आठवड्यात जतहद्दीत एक अपघात झाला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे. हा तपास बागडी याच्याकडे होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे बागडीने 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम दिली तरच तपासात मदत केली जाईल; नाही तर अटक करू, असे त्याने सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होते. या विभागातील पथकाने तक्रारीची चौकशी केली. त्यावेळी बागडीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

पथकाने लावलेल्या सापळ्यानुसार तक्रारदाराने लाचेची रक्कम सोमवारी सायंकाळी देतो, असे सांगितले. तत्पूर्वी पथकाने जत पोलिस ठाण्याच्या आवारात वेषांतर करून सापळा लावला, पण बागडी त्यावेळी नव्हता. त्याने कारंडेला लाचेची रक्कम घेण्यास सांगितले.

तक्रारदाराकडून 25 हजाराची लाच घेतल्याचा ‘सिग्नल’ मिळताच कारंडेला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या घराचीही झडती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याला दि.19 जुलैरोजी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, हवालदार अविनाश सागर, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, संजय संकपाळ, भास्कर भोरे, सलीम मकानदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button