म्हैसाळ हत्याकांड प्रकरण : मांत्रिक बागवान याच्या पोलिस कोठडीत वाढ | पुढारी

म्हैसाळ हत्याकांड प्रकरण : मांत्रिक बागवान याच्या पोलिस कोठडीत वाढ

मिरज; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबीयांच्या हत्याकांड प्रकरणी मुख्य संशयित मांत्रिक आब्बास बागवान याला अटक करण्यात आली आहे. त्याची कोठडी संपल्याने त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल तपास करायचा आहे. तसेच सोलापूर येथे नवीन पुरावे सापडल्याने त्याची देखील चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांनी बागवान याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ केली आहे.

म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबीयांच्या हत्याप्रकरणी सोलापूर येथून पोलिसांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याचे सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा तपास करण्यात येत असून यामध्ये महत्वाचे चित्रीकरण असल्याचे सांगण्यात आले.

साखळी पद्धतीने विषारी गोळ्या मिळवून हे हत्याकांड करण्यात आले असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, मांत्रिकाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक सोलापूर येथे गेले होते. त्यावेळी मांत्रिक राहत असलेल्या त्याच्या बहिणीच्या घरी पुन्हा झडती घेण्यात आली. तसेच एक सीसीटीव्ही आणि डीव्हीआर मशीन जप्त करण्यात आले आहे. या सीसीटीव्हीमध्ये बागवान याच्या विरुद्धचे भक्कम असे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीसीटीव्हीबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

दरम्यान, सोलापूर येथील घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मिरज पोलिसांनी सोलापुरात काही ठिकाणी छापे टाकून चौकशी केली. यावेळी बागवान याने गुप्तधनासाठी काही भांडी वनमोरे यांच्या घरी आणून ठेवली होती. हत्याकांड झाल्यानंतर मांत्रिक बागवान याने ती सर्व भांडी सोलापूर येथे नेवून एका दुकानात विकली असल्याचे तपासात समोर आले आहे. कोणकोणती भांडी होती, त्याचा कशासाठी वापर केला होता? याचा पोलिस शोध घेत असून भांडी विकत घेतलेल्या सोलापुरातील त्या दुकानदाराकडे देखील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली.

मांत्रिक बागवान याने हत्याकांड करण्यासाठी म्हैसाळ येथे येत असताना वाहनाचा क्रमांक बदलला होता, असे त्याने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले होते. तो नंबर कोणता, नंबर प्लेट कोणी बनवून दिली, याचा देखील तपास करण्यात येत आहे. तसेच मांत्रिकाने विषप्रयोग करण्यासाठी नऊ बाटल्यांचा वापर केला होता. त्या बाटल्या त्याने सोलापूर येथे खरेदी केल्या की आणखीन कोठे याची चौकशी मांत्रिक बागवान याच्याकडे करण्यात येत आहे.

दरम्यान, वनमोरे यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीमधील 25 जणांची चौकशी करण्यात येत आहे. परंतु ज्यांचा यामध्ये संबंध नाही, त्यांना मुक्त करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने काही जणांना जामीन मंजूर केला असल्याचे सांगण्यात आले.

मांत्रिकाच्या तोंडाला कुलूप : पोलिसांची पंचाईत

हत्याकांड करून आत्महत्याचा ढोंग करणार्‍या मांत्रिकापर्यंत पोलिस पोहोचले खरे परंतु त्याच्याकडून गुन्हा कबूल करता-करता पोलिसांच्या नाकी-नऊ आल्याचे दिसून येते. मांंत्रिक बागवान हा पोलिस तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याचे दिसून येते. छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुन्हा कबुलीसाठी एरव्ही लावण्यात येणारी ‘थर्डडिग्री’ याला मात्र लावता येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मांत्रिक बागवान याच्याकडे गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मोबाईल स्विच ऑफ : थांगपत्ता लागेना

वनमोरे कुटुंबीयांच्या हत्याकांडमध्ये मांत्रिक बागवान याच्या बहिणीचा कितपत सहभाग आहे. याची चाचपणी पोलिस करीत आहेत. हत्याकांड झाल्यापासून ती फरारी असून पोलिसांच्या हाती अद्यापतरी लागलेली नाही. तिचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत. नातेवाईकांकडे चौकशी करण्यात येत आहे. काही नातेवाईकांकडे छापेमारी करण्यात आली. परंतु त्या ठिकाणी ती मिळून आली नाही. तिने तिच्या बँक खात्यावर कोणाकडून पैसे घेतले आहेत का? आणि म्हैसाळ प्रकरण तिला माहीत होते का? याची चौकशी तिच्याकडे करण्यात येणार आहे.

Back to top button