सांगलीत नवीन कैद्यांना प्रवेश बंद! | पुढारी

सांगलीत नवीन कैद्यांना प्रवेश बंद!

सांगली : पुढारी वृत्तसेवा

येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने ‘हाऊसफुल्ल’ झाल्याने कारागृह प्रशासनाने नवीन कैद्यांना प्रवेश बंद केला आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्येने क्षमता ओलांडली असल्याने कारागृहातील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारागृहात 235 कैदी ठेवण्याची क्षमता आहे. सध्या 288 कैदी आहेत. सहा वर्षापूर्वी तर 435 कैदी झाले होते. त्यांना झोपायला जागा नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कारागृह प्रशासनाने यातील दीडशे कैदी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात हलविण्याची न्यायालयास विनंती केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केली. तेव्हापासून 280 च्यावर एकही कैदी येथे ठेवला जात नव्हता. सरसकट नवीन कैद्यांना कळंब्याला हलविले जात होते.

गेल्या तीन वर्षांपासून सलग तीन दिवस सांगलीत महापूर येत आहे. पुराचे पाणी आठ-आठ दिवस कारागृहात साचून राहते. त्यावेळी कैद्यांना ठेवायचे कुठे, असा प्रश्‍न निर्माण होतो. तीन वर्षे तरी दुसर्‍या मजल्यावरील बरॅकमध्ये कैद्यांना ठेवण्यात आले होते. तरीही पुराच्या पाण्यात उडी टाकून दोन कैद्यांनी पलायन केले होते. सुरक्षारक्षकांनी जीवाची परवा न करता पाण्यात उड्या मारून सांगली हायस्कूलजवळ या दोन कैद्यांना पकडले होते.

गेल्या महिन्यात एका कैद्यावर खुनीहल्ला झाला. अनेक गंभीर गुन्ह्यांतील आठ टोळ्यांमधील 40 गुन्हेगार येथे आहेत. तसेच यावर्षीही पुराचा धोका आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. याचा सार्‍या बाबींचा विचार करून कारागृह प्रशासनाने न्यायालयास नवीन कैद्यांना येथे ठेवण्यास परवानगी देऊ नये, अशी विनंती केली. त्यानुसार गेल्या चार दिवसापासून एकाही नवीन कैद्याला या कारागृहात प्रवेश दिला जात नाही. नवीन कारागृहासाठी 32 एकर जागा हवी आहे.

पोलिसांची कळंबा वारी सुरू

जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांतील अडीचशेहून अधिक कैदी सध्या कळंबा कारागृहात आहेत. न्यायालयीन सुनावणीला आणण्यासाठी सध्या पोलिसांची मात्र सातत्याने कळंबा वारी सुरू आहे. कैद्यांना आणण्यासाठी व्हॅन, पुरेसा बंदोबस्त घेऊन कळंब्यात सकाळी दहा वाजता पोहचावे लागते. सुनावणीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा सोडून यावे लागत असल्याने पोलिसांची तारेवरची कसरत सुरू आहे.

पहाटे तीनपासून स्वयंपाक

कारागृहात 285 कैद्यांना दूध, नाष्टा आणि दोन वेळचे जेवण देण्यासाठी पहाटे तीनपासून स्वयंपाक खोलीत काम सुरू होते. सात वाजता दूध, केळी दिल्यानंतर दहा वाजता जेवण द्यावे लागते. रात्रीचे जेवण देण्यासाठी पुन्हा दुपारी बारापासून स्वयंपाकाचे काम सुरू होते. कैद्यांकडून ही सर्व कामे करून घ्यावी लागत आहेत. दररोज दोनवेळा सहाशे कैद्यांना स्वयंपाक करण्यात येत आहे.

Back to top button