सांगली, मिरजेत चोरीच्या वाहनविक्रीचे रॅकेट | पुढारी

सांगली, मिरजेत चोरीच्या वाहनविक्रीचे रॅकेट

मिरज ः स्वप्निल पाटील सांगली, मिरज शहरात मोटारसायकल चोरून त्यांची कर्नाटकात विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश महात्मा गांधी चौक पोलिसांनी केला आहे. या टोळीकडून आणखीन काही चोर्‍या उघडकीस येतात का, याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रवीराज फडणीस करीत आहेत. सांगली, मिरज शहरात सध्या मोटारसायकल चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दोन्ही शहरातून दररोज किमान दोन ते तीन मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. या चोरट्यांचा उलघडा करण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. सांगली, मिरजेत मोटारसायकल चोरून ती कर्नाटकत विक्री करणार्‍या टोळीचा महात्मा गांधी चौक पोलिसांना सुगावा लागला होता. चार दिवसांपूर्वी चोरी केलेल्या दोन मोटारसायकल विक्रीसाठी कर्नाटकातून दोघे मिरजेत आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रवीराज फडणीस यांना मिळाली होती.

कर्नाटकातील दोघांसह मिरजेतील एकास अटक केल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मोटारसायकलच्या चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात येतात. गुन्हा उघडकीस न आल्यास फाईल बंद होते. सीमाभागालगत मोटारसायकल चोरायची आणि ती थेट 400 किलोमीटर अंतरावर नेऊन विकायची, असा प्रकार सध्या सुरू आहे. काही वर्षांपूर्वी मोटारसायकल चोरल्यानंतर तिचे सुटे पार्ट करून विकले जात होते. परंतु आता नंबर प्लेट बदलून कर्नाटक पासिंगचे नंबरप्लेट लावून मोटारसायकलच विक्री करणारे रॅकेट तपासात पुढे आले आहे. काही हजारांत विक्री सांगली, मिरजेत चोरी केलेल्या महागड्या मोटारसायकलची विक्री केवळ 15 ते 40 हजारांना केली जात असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात चोरी केलेले वाहन विक्रीसाठी टोळ्यांकडून कर्नाटकातदेखील एजंट नेमले असल्याचे सांगण्यात आले.

नंबरप्लेट बदलून कर्नाटकात विक्री : अनेक टोळ्या सक्रिय

स्थानिकांच्या मदतीने टोळ्या सक्रिय

मोटारसायकल चोरण्यासाठी या टोळीकडून काही ठराविक ठिकाणे निश्‍चित केली जातात. गर्दीची ठिकाणे, परजिल्ह्यातून नागरिक येणारी ठिकाणे इत्यादी ठिकाणावरुन मोटारसायकल चोरल्या जातात. यासाठी टोळ्यांकडून स्थानिक चोरट्यांची मदत घेतली जाते. त्यासाठी त्यांना कमिशन देखील दिले जाते. चारशे ते पाचशे किलोमीटर अंतरावरून येऊन सांगली, मिरजेत मोटारसायकल चोरी करणार्‍या अशा अजून किती टोळ्या सक्रिय आहेत, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Back to top button